Ganeshotsav 2024 – गणेश पूजनात तुळशी वर्ज्य आहे; जाणून घ्या कारण…

महाराष्ट्रात ज्या सणाची आतुरतेने वाट बघितली जाते तो म्हणजे गणेशोत्सव. आता गणेशोत्सवाची सुरुवात झाली असून त्याची पूजाअर्चना सुरू आहे. मात्र, सर्व पूजेत आवर्जून वापरली जाणारी तुळशी गणेशपूजनात वर्ज्य आहे. गणेशपूजनात तुळशी का वापरली जात नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामागे एक कथा सांगितली जाते. जाणून घेऊ ती कथा.

भगवान गणेश एकदा गंगाकिनारी तप करत होते. त्याचवेळी धर्मात्मजची कन्या असलेली तुळशी आपल्या विवाहासाठी स्थळ शोधत तीर्थयात्रा करत त्याठिकाणी आली. रत्नजडित आसनावर चंदनाचा लेप लावून आणि अनेक आभुषणे घालून तपाला बसलेल्या श्रीगणेशाच्या रुपाने ती आकर्षित झाली.

गणेश तप करत असतानाचे त्यांचे रुप मनमोहक होते. तुळशी त्या रुपाने मोहित झाली. तिने कसलाही विचार न करता तपसाधना करणाऱ्या गणेशाच्या साधनेत व्यत्यय आणला. गणेशाचे तप भंग करून तिने गणेशासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला.

तपसाधना भंग झाल्यामुळे श्रीगणेश संतप्त झाले होते. त्यातच तुळशीने त्यांच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवल्याने त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी तुळशीचा विवाहाचा प्रस्ताव नाकारला. श्रीगणेशाने विवाहाला नकार दिल्याने तुळशीलाही राग आला. तिने श्रीगणेशाला तुझे दोन विवाह होतील, असा शाप दिला.

तिने शाप दिल्याने गणेशालाही राग आला. त्यांनीही तुळशीला तुझा विवाह असुराशी होईल, असा शाप दिला. गणेशाने दिलेला शाप ऐकून तुळशीला आपली चूक समजली. तिने गणेशाची माफी मागितली. क्षमायाचना केली. त्यावेळी गणेशाने तिला उःशाप दिला. तुझा विवाह शंखचूर्ण राक्षसाशी होईल. त्याच्या वधानंतर तू वनस्पतींचे रुप धारण करशील. त्या रुपात तुझी पूजा होईल, असे गणेशाने तिला सांगितले.

तुळशीच्या रुपात तू विष्णुरुपातील श्रीकृष्णाला प्रिय असशील. विष्णूपूजेत आणि कृष्णपूजेत तुला महत्त्वाचे स्थान असेल. कलीयुगात बहुगुणी औषधी वनस्पती म्हणून तू पूज्य असशील. मात्र, माझ्या पूजेत तुला स्थान नसेल. माझ्या पूजेसाठी तू वर्ज्य मानली जाशील, असे गणेशाने तुळशीला सांगितले. त्यामुळे गणेशपूजनात तुळशी वर्ज्य मानली जाते, असे सांगितले जाते. गणेशपूजनात जास्वंदीचे फूल आण दुर्वा महत्त्वाच्या मानल्या जातात. तसेच गणेशाला 21 पत्रीही अर्पण करण्यात येतात. मात्र, गणेशपूजनात तुळशीला स्थान दिले जात नाही.