मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ांचे विघ्न, एसटीचा संप, रेल्वेगाडय़ांचा खोळंबा अशी अनेक दिव्ये पार करून गौरी-गणपतीसाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासातही वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीपासून रायगड जिल्हय़ात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून कित्येक तास वाहतूककोंडीत अडकल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची झालेली चाळण, मुसळधार पाऊस आणि चिखलाचा राडारोडा यामुळे वाहतूक मुंगीच्या गतीने पुढे सरकत असून परतीच्या प्रवासातही चाकरमान्यांनी मिंधे सरकारच्या नावाने शिमगा केला.
दीड, पाच आणि गौराईसह सात दिवसांच्या बाप्पांना धूमधडाक्यात निरोप दिल्यानंतर चाकरमान्यांची मुंबईला परतण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे कोकणातील सर्वच एसटी स्थानकांमध्ये तुडुंब गर्दी उसळली आहे. एसटी महामंडळाने 2 हजार 553 गाडय़ांची नियोजन केले, मात्र त्याही अपुऱ्या पडल्या. प्रचंड खड्डे, डायव्हर्जनमुळे होणारी अरुंद रस्त्यावरील एकेरी वाहतूक यामुळे प्रचंड वाहतूककोंडीचा सामना चाकरमान्यांना करावा लागत आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्हय़ात ठिकठिकाणी गाडय़ा अनेक किलोमीटरच्या टॅफीक कोंडीमुळे अडकून पडल्या. त्यामुळे वृद्ध, महिला व लहान मुलांचे प्रचंड हाल झाले.
23 किलोमीटरसाठी दीड तास
इंदापूर, माणगाव, कोलाडदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. इंदापूर ते कोलाडदरम्यान 23 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना सुमारे दीड तास लागत होते.
300 रेल्वेगाडय़ाही अपुऱ्या
चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने तीनशेहून अधिक गाडय़ा सोडल्या, मात्र या गाडय़ाही अपुऱ्या पडल्या.
z नागोठणे, सुकेळी खिंड, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे तसेच टेमपाले येथील रस्त्यांची दुर्दशा असून पावसामुळे रस्त्यावर चिखलाचा राडारोडा आहे. z रस्त्यावर अवजड वाहनेही असल्यामुळे वाहतूककोंडीत आणखी भर पडली असून मुंबईपर्यंत पोहोचेपर्यंत खड्डय़ांमुळे हाडे अक्षरशः खिळखिळी होण्याची परिस्थिती चाकरमान्यांवर ओढवली आहे.