Ganeshotsav 2024 शिवशंकराला प्राप्त करण्यासाठी पार्वतीने कसे केले व्रत; जाणून घ्या हरितालिकेची कहाणी…

>> योगेश जोशी

व्रत वैकल्यांच्या श्रावण महिन्यात जवळपास सर्वच वारांची एक वेगळी कथा आणि महत्त्व आहे. या कथा सर्वांनाच रोचक वाटतात तसेच या प्रत्येक सणाचे आणि व्रतवैकल्याचे वेगळेच महत्त्व आहे. आता भाद्रपद महिना सुरु झाला असून या महिन्यात तृतीयेला हरितालिका व्रत पाळले जाते. विवाहित महिला अखंड सौभाग्य आणि पतीच्या दिर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. तर कुमारिका चांगला पती मिळाला यासाठी हे व्रत करतात. आता या व्रताची नेमकी काय कहाणी आहे, ते जाणून घेऊया.

विविध पुस्तकात थोड्याफार फरकाने हिरतालिकेची कहाणी सांगण्यात येत ती पुढील प्रमाणे आहे. एके दिवशी शिवशकंर आणि पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, “महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ, असं एखादं व्रत असलं, तर मला सांगा. तसेच मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा.” तेव्हां शंकर म्हणाले, “जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, देवात विष्णु श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त केलेस, त्याबाबतची ही कथा आता ते ऐक.

हे व्रत भाद्रप्रद महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षे तर झाडाची पिललेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहुन तुझ्या वडिलांना फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी? अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, “तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्यायोग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून इथं मी आलो आहे.” हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले.

नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करणं नाही; असा माझा निश्चय आहे. मात्र, माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबुल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापिलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं, नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं.

तू म्हणालीस, “तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही.” नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे.

“ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साती जन्माचं पातक नाहीस होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं.”

ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी, सुफळ संपूर्ण.

अशाप्रकारे हरितालिकेची कथा सांगितली जाते. तसेच या कथेत सांगितल्याप्रमाणे व्रत केले जाते.