Ganeshotsav 2024 – निर्माल्यापासून साकारला ‘मुंबईचा पेशवा’

घरगुती गणेशोत्सवाप्रमाणे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळदेखील आता पर्यावरणपूरक मूर्ती विराजमान करताना दिसत आहेत. ‘मुंबईचा पेशवा’ अशी ख्याती असलेल्या विलेपार्ले पूर्व येथील बाळ गोपाळ मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवातर्फे यंदा निर्माल्य आणि कागद यांच्या मिश्रणापासून 25 फुटांची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. सफेद टोपी आणि पारंपरिक वेशभूषेत असलेले चार उंदीरमामा पालखीतून बाप्पाला घेऊन जात आहेत, असा देखावा मूर्तिकार राजेश दिगंबर मयेकर यांनी साकारला असून ही मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

‘मुंबईचा पेशवा’ मंडळाचे यंदाचे 36 वे वर्ष आहे. मुंबईत पहिली कागदी मूर्ती घडवणारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून ‘मुंबईचा पेशवा’ हे मंडळ प्रसिद्ध आहे. गेल्या 17 वर्षांपासून मंडळातर्फे कागदी टिशू पेपरपासून बनवलेली मूर्ती विराजमान करण्यात येते. गणेशोत्सवात मंडळातर्फे दरवर्षी सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर केले जातात. याशिवाय वर्षभर रक्तदान शिबीर, गरजूंना वैद्यकीय मदत, आदिवासी पाडय़ात धान्यवाटप, दिवाळीत महिलांना साडी वाटप आदी सामाजिक उपक्रम राबवले जातात.

माजी नगरसेवक शैलेश परब यांच्या वतीने जोगेश्वरी विधानसभेत गणेश चतुर्थीनिमित्त प्रसाद साहित्य भेट हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, विधानसभा संघटक  विश्वनाथ सावंत, उपविभागप्रमुख बाळा साटम, उपसचिव अमित पेडणेकर, उपविभाग समन्वयक कालिदास कांदळगावकर, महेश गवाणकर, सुचित्रा चव्हाण, अंकुश मोर्वेकर, रीटा राघवा उपस्थित होते.