>> योगेश जोशी
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिका व्रत करण्यात येते. या दिवशी कुमारिका आणि विवाहित महिला उपवास करतात. हरतालिका व्रतानिमित्ताने पार्वती आणि शंकराची पूजा करतात. चांगला पती मिळावा, यासाठी हे व्रत करण्याची प्रथा आहे.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत करण्यात येते. या दिवशी विवाहित महिला आणि कुमारिका भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात. यादिवशी वाळूचे शिवलिंग बनवून किंवा पार्वती आणि तिच्या सखीची मूर्ती आणून पूजा करण्यात येते. धार्मिक मान्यतेनुसार, विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि पतीच्या सौभाग्यासाठी हे व्रत करतात. तसेच कुमारीका चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी हे व्रत करतात.
यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 वाजता सुरू होत आहे. तर 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 वाजता संपणार आहे. पंचागानुसार ज्या दिवशी सूर्योदयाला तिथी असते. ती दिवसभर मानण्यात येते. या नियमानुसार शुक्रवारी 6 सप्टेंबर रोजी उदयतिथीनुसार हरतालिका व्रत करता येणार आहे. या दिवशी पूजेचा मुहूर्त सकाळी 6.01 ते 8.32 वाजेपर्यंत आहे. या वेळेत शक्य झाले नाही तर दुपारी 3 वाजेपूर्वी पूजा करता येणार आहे.
अनेक महिला दरवर्षी नित्यनेमाने हे व्रत करतात. तसेच काही महिला निर्जला म्हणजे पाणीही न घेता पूर्ण दिवस उपवास करतात. हे व्रत सुरू केल्यानंतर त्याचे उद्यापन केल्याशिवाय मध्येच सोडता येत नाही. हे व्रत करणाऱ्या महिला रात्री जागरण करतात आणि शिवशंकराची उपासना करतात. तसेच उपवास करणाऱ्या महिलांनी चिडचिड करु नये आणि रागावर नियंत्रण ठेवावे, असे सांगण्यात येते.
पूर्वकाली पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असलाने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, ‘तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन’. इतक्यावरच ती थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिवाच्या प्राप्तीसाठी अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा सुरू केली. त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते.पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले.तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला अशी आख्यायिका सांगण्यात येते.