Ganeshotsav 2024 – गौरी आली सोन्याच्या पाऊली; जाणून घ्या गौरीपूजनाचे महत्त्व…

>> योगेश जोशी
गणेशोत्सवात गणेशपुजनाइतचकेच महत्त्व गौरीपूजेचेही आहे. गणेशोत्सवात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आमगन म्हणजेच आवाहन करण्यात येत. जेष्ठा नक्षत्रात गौरीपूजन करण्यात येत. तर मूळ नक्षत्रावर गौरीविसर्जन होते. जेष्ठा नक्षत्रावर गौरीपूजन होत असल्याने याला जेष्ठागौरी असेही म्हणतात. तसेच काही ठिकाणी महालक्ष्मीचे आवाहन  आणि पूजनही करण्यात येते. गणेशोत्सावात येणाऱ्या गौराईबाबत जाणून घेऊया.
आपल्याकडे आदिशक्तीच्या पूजनासाठी शांकभरी, चैत्री आणि अश्विन मासात नवरात्री येतात. तसेच श्रावण महिन्यात मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करण्यात येते. तर गणेशाच्या आगमनापूर्वी भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका पूजन करण्यात येते. त्यानंतर गणेश चतुर्थीला गणेशाचे आगमन होते. पुत्रविहरामुळे व्याकुळ झालेली पार्वती म्हणजेच गौरी आपल्या पुत्राला म्हणजेच गणेशाला भेटायला येते आणि आपल्यासोबत नेते, अशी मान्यता असल्याने काहीठिकाणी गौरीसोबतच मूळ नक्षत्रावर गणेशाचेही विसर्जन करण्यात येते.
गौराईची राज्यात विविध प्रकारे पूजा करण्यात येते. काही ठिकाणी गौराईची महालक्ष्मीरुपात पूजा करण्यात येते. काही ठिकाणी गौराईचे मुखवटे आणून त्याची चांगली सजावट करतात. काही ठिकाणी सात विशिष्ट प्रकारचे विशेष करून जलाशयाजवळचे खडे आणतात. काही ठिकाणी गौराईची वनस्पतीच्या रुपात पुजा करण्यात येते. गौराई पूजनात दोन मुर्ती ठेवतात. गौरी तर एकच आहे मगण दोन मुर्ती का असा प्रश्न अनेकांना पडतो. जेष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी या दोन बहिणींची एकाचवेळी पूजा करण्यात येते.त्यामुळे दोन मुखवटे किंवा मुर्ती मांडून त्याची पूजा करण्यात येते.
भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आवाहित केल्या जाणाऱ्या देवतेस श्रीमहालक्ष्मी असे संबोधले जाते. या देवतेचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर आणि पूजन जेष्ठा नक्षत्रावर तसेच विसर्जन मूळ नक्षत्रावर होते.  जेष्ठा नक्षत्रावर आगमन होत असल्याने या देवतेला जेष्ठा लक्ष्मी म्हटले जाते. तसेच लक्ष्मीची जेष्ठ भगिनी अलक्ष्मी हिची पूजा या दिवशी केली जाते. याबाबत आख्यायिका सांगण्यात येते. समुद्रमंथनातून  श्रीमहालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मी यांचा जन्म झाला. श्रीविष्णूने श्रीलक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या जेष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही, असे श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण श्री अल्क्ष्मीचे अवगुणांमुळे तो तपस्वी वनात पळून गेला. त्यामुळे अलक्ष्मी पिंपळाचे झाडाखाली चिंतीत रडत होती.
श्रीविष्णूने अलक्ष्मीला रडताना पाहिले. तिच्या रडण्याचे कारण समजताच त्यांनी अलक्ष्मीला वरदान दिले. जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे, असे त्यांनी तिला सांगितले. दरवर्षी भाद्रपद शुद्ध मासात जेष्ठा नक्षत्रावर तिची लक्ष्मीसह पूजा केली जाईल. तेव्हापासून जेष्ठा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते. ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे. तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते. कारण श्रीअलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते.
गौरी आगमनासाठी रांगोळीने आठ पावले काढली जातात. प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उच्चार केला जातो. गौरी आली सोन्याच्या पाऊली…गौरी आली चांदीच्या पाऊली…गौरी आली धान्याच्या पाऊली…अशाप्रकारे अष्टलक्ष्मीचा जयजयकार करत लक्ष्मीचे स्वागत करण्यात येते.  गौरी आणि लक्ष्मी आवाहन करण्याच्या अनेक पद्धती निरनिराळ्या प्रांतांनुसार प्रचलित आहेत. काही घरात चांदीच्या किंवा पितळ्याच्या किंवा मातीच्या मुखवट्यावर तर काही जणी सुघट (संक्रांत, घट, मातीचे भांडे), काही घरात वाहत्या पाण्याजवळच्या खड्यांवर तर काही जणी मूर्तीवर गौरीचे आवाहन करतात. काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात.
जेष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशीणच. या दिवशी सासूरवाशिणींना आपल्या माहेरी विशेष मान असतो. गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे. त्यात प्रामुख्याने भाजी-भाकरीचा, ज्वारीच्या कण्याचा समावेश होतो. संध्याकाळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम करून रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.
अनुराधा नक्षत्रावर आगमन झालेल्या लक्ष्मीचे जेष्ठा नक्षत्रात पूजन करून पुरणाचा नैवेद्य दाखविला जातो. गौरींचे किंवा महालक्ष्मीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर करणे गरजेचे आहे. विसर्जनाच्यावेळी दहीभाताचा नैवैद्य केला जातो. यावेळी या देवतेवर अक्षता वाहून तिला निरोप दिला जातो. तसेच घरातील सुख,समृद्धी, धनधान्य वृद्धी, पशुधन वृद्धीसाठी आमच्या घरात तुझे वास्तव्य असावे, अशी प्रार्थना लक्ष्मीला करण्यात येते.