>> योगेश जोशी
महाराष्ट्रात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. यासाठी अनेक वस्तूंच्या खरेदीसाठी गणेशभक्तांची लगबग सुरू आहे. गणपती बाप्पाला लाडू आणि मोदकाचा प्रसाद प्रिय आहे. त्याचप्रमाणे जास्वंदीचे फूलही बाप्पाला आवडते. त्याचप्रमाणे गणेशपूजेसाठी 21 पत्री महत्त्वाची मानली जातात. त्याचप्रमाणे गणेशपूजेसाठी दुर्वांचे विशेष महत्त्व आहे. बाप्पाला दुर्वा प्रिय असण्यामागील कथा जाणून घेऊया.
दुर्वांशिवाय बाप्पाची पूजा पूर्ण होतच नाही. इतर साहित्य नसेल तर जास्वंदीचे फूल आणि दुर्वांची 21 जुडी बाप्पाला अर्पण करतात. गणपतीला अर्पण करण्यात येणाऱ्या दुर्वा नेहमी 11, 21 किंवा 51 अशा संख्येची जुडी करून वाहतात. गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय असण्यामागे एक पौराणिक कथा सांगण्यात येते.
पूर्वी अनलासूर नावाचा राक्षस होता. त्याची दहशत सर्वत्र पसरली होती. त्याच्या त्रासाला ऋषी, साधू, माणेस देव सर्वच त्रस्त झाले होते. कोणत्याही देवतेकडून अनलासूराचा वध होणार नव्हता. त्यामुळे गणेशाने या संकटाचे निवारण करावे, अशी प्रार्थना सर्व देवांनी गणाधिपती गणपती बाप्पाला केली. सर्व देवांची विनंती गणेशाने मान्य केली. अनलासूराचा वध होणार नसल्याचे गणपतींना माहित होते. त्यामुळे या संकटाचा नाश करण्यासाठी त्यांनी अनलासूराला गिळून टाकले. अनलासूराला गिळल्यानंतर गणेशाच्या शरीराचा दाह सुरू झाला. पोटातील आग शमवण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर काही ऋषींनी श्रीगणेशाला दुर्वांची जुडी करून ती घेण्यासाठी दिली. दुर्वांचे सेवन केल्यावर गणेशाच्या पोटातील आग शांत झाली आणि शरीराचा दाहपण थांबला. तेव्हापासून गणेशपूजनात दुर्वा वापरल्या जातात.
दुर्वा या वनस्पतीचे अनेक औषधी उपयोगही आहेत. आपल्या पौराणिक कथा आणि आख्यायिकांमध्ये अशा आयुर्वेदीक वनस्पतींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या अनेक आजारांवर दुर्वा उपयोगी ठरत असल्याने याचा समावेश गणेशपूजेश करण्यात आल्याचे काही जाणकारांनी सांगितले.
गुणकारी दुर्वा
– दुर्वांचा रस थंड प्रकृतीचा असतो. उष्णतेचा विकार यावर ते गुणकारी आहे.
– मासिक पाळीच्या समस्यांवर दुर्वांचा रस प्यावा.
– अर्ध शिशीसाठी नाकात दुर्वाचा रस घालतात.
– जखमेतून रक्तस्त्राव होत असून तो लवकर थांबण्यासाठी दुर्वांचा रस लावावा.
– सारखी उचकी लागत असल्यास दुर्वांच्या मुळांचा रस आणि मध एकत्र करून प्यावे.