ढोल-ताशा पथकांमध्ये महिलांचाच आवाज!

>> राजाराम पवार

पारंपरिक पेहराव.., चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा उत्साह…, हातात टिपरू…, कमरेला रस्सीने घट्ट बांधलेला ढोल…, पुरुष सहकाऱ्यांच्या तोडीसतोड असे बेभान करणारे ढोल-ताशावादन करत आपल्या भक्ती आणि शक्तीची उधळण करणाऱ्या ढोल-ताशा पथकातील महिला वादक आजच्या गणेशोत्सवातील मिरवणुकींमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. कौटुंबिक जबाबदारी, मुलांचे पालनपोषण, नोकरी, व्यवसाय, सततचा ताणतणाव यामध्ये दबलेल्या महिलांना ढोल-ताशा पथक हे स्वतः मधील कला सादर करण्यासाठीचे एक माध्यम तर बनलेच आहे. परंतु डॉल्बी-डीजेच्या जमान्यात या महिला आपल्या कलात्मक वादनाने ढोल- ताशा संस्कृतीचाही वारसा जोपासत आहेत.

गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपला असून, आता ढोल-ताशा पथकांच्या सरावाचाही आवाज घुमण्यास सुरुवात होईल. त्यामुळे आतापासूनच तरुणाईची पावले ढोल-ताशा पथकांकडे वळण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही वर्षांमध्ये महिलांचाही ढोल-ताशा पथकांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग वाढत आहे. अगदी शाळा-कॉलेजला जाणाऱ्या मुलींपासून ते डॉक्टर, इंजिनीअर, आयटी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या चाळीस- पन्नास वर्षांपर्यंतच्या उच्चशिक्षित महिलाही आपल्या कामाचा व्याप सांभाळून उत्साहाने ढोल-ताशा वादनाची कला आत्मसात करण्यासाठी पथकांच्या सरावामध्ये सहभागी होत आहेत. ढोल- ताशा वादनाची कला शिकण्यासाठी कोणत्याही पात्रतेची गरज नसते. त्यामुळे दिवसभर आपल्या कामाचा व्यवसाय सांभाळून या महिला संध्याकाळी ढोल-ताशा पथकांच्या सरावाला हजर होतात. गणेशोत्सवातील मिरवणुकांची खऱ्या अर्थाने शोभा वाढते ती ढोल-ताशा पथकांमुळेच.

मिरवणुकांमध्ये डीजे-डॉल्बीच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईमध्येही अलीकडे ढोल-ताशा पथकाच्या लयबद्ध वादनाचे आकर्षण वाढत आहे. त्यामुळे शहरातील मानाच्या मंडळांबरोबरच अन्य मंडळांकडूनही ढोल-ताशा पथकांना मागणी वाढत असल्यामुळे शहरात ढोल-ताशा पथकांचीही संख्या वाढत आहे. सध्या शहरात एकूण 120 ते 125 ढोल-ताशा पथके आहेत. पूर्वी शहरात केवळ शाळांची ढोल-ताशा पथके होती. त्यानंतर शाळांव्यतिरिक्त बाहेर सामूहिक पथके तयार होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता शहरात पथकांची संख्या वाढली आसून, या पथकांमध्ये महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच आता केवळ महिलांचीच ढोल-ताशा पथके निर्माण होत आहेत.

” ढोल-ताशा पथकांमध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे. सध्याच्या पथकांमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत आहे. नोकरी, कुटुंब साभाळत असताना नवीन काही तरी करायला मिळत असल्याने कॉलेज तरुणींसह गृहिणी असलेल्या महिलाही उत्साहाने पथकांमध्ये सहभागी होत आहेत. म्हणून केवळ महिलांची पथकेही निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

– पराग ठाकुर, अध्यक्ष, ढोल-ताशा महासंघ

आपला दैनंदिन कामाचा व्याप सांभाळून एखादा छंद जोपासण्यासाठी अनेक महिला सध्या ढोल-ताशा पथकांमध्ये सहभागी होत आहेत. माझ्या पथकामध्ये 40 टक्के महिला वादक आहेत. यात 16 वर्षांपासून ते 50 वर्षांपर्यंतच्या महिलांचा सहभाग आहे. डीजे, डॉल्बीच्या जमान्यात या महिला आपली ढोल-ताशांची संस्कृती जोपासत आहेत.

– सोनाली पोकळे, अध्यक्षा, राजगर्जना वाद्यपथक ट्रस्ट