विघ्नहर्त्यावर महागाईचे विघ्न; मूर्तीच्या किमती 156 टक्क्यांनी वाढल्या

>> श्रीकांत नांदगावकर

गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपला असल्याने गणपती कारखान्यात मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. बाप्पाच्या आगमनाचे वेध सर्वांनाच लागले असले तरी यावेळच्या गणेशोत्सवाला मात्र महागाईची झळ बसणार आहे. मूर्तीच्या किमतीत सरासरी 15 टक्के वाढ झाली आहे. पीओपी, शाडू, रंग, काथ्या आदी कच्च्या मालाच्या भावात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शिवाय कारागिरांची मजुरीही वाढली आहे. याचा थेट परिणाम मूर्तीच्या दरात वाढ झाली आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी कारागीर मूर्ती तयार करण्यात दंग असून एक फुटापासून 21 फुटांपर्यंतच्या मूर्ती तयार होत आहेत. 251 पासून 25 हजारांपर्यंतच्या मूर्तीच्या किमती आहेत.

गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पाच दिवस आरती, महाप्रसाद, भजन, नाच यामुळे एकप्रकारे भक्तिमय वातावरण निर्माण होते. गणेशोत्सवासाठी नागरिक लवकरच तयारीला लागत असून जवळपास एक ते दीड महिना आधीपासूनच कारखान्यात आपल्याला हव्या असलेल्या गणेश मूर्तीची ऑर्डर देऊन ठेवतात. याबाबत शहरातील अष्टविनायक कलामंदिरचे मालक सतीश शिंदे यांनी सांगितले की तळा शहर, तालुका तसेच तालुक्याबाहेरील काही नागरिक अगोदरच आपल्याला हव्या असलेल्या मूर्तीची ऑर्डर देतात. पेण येथून कच्चा माल आणावा लागत असून पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे गाडीभाड्यात किलोमीटरमागे सरासरी 50 रुपयांची वाढ झाली आहे.

कला जोपासण्यासाठीच धडपड

यावर्षी मूर्तीच्या दरात जवळपास दीडशे ते दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. त्यातच कारागिरांची मजुरी वाढली आहे. वाढत्या महागाईत कारखाने चालवणे परवडत नसले तरी केवळ कला जोपासण्यासाठी आम्ही हा वारसा पुढे चालवत आहोत, असेही सतीश शिंदे यांनी सांगितले.

कारागिरांची मजुरी वाढली

गेल्या वर्षी कारागिरांची मजुरी किमान पाचशे रुपये होती, ती आता सातशे रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मूर्ती बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि मजुरी या सर्वांचीच दरवाढ झाल्याने याचा परिणाम मूर्तीच्या किमतीवर झाला आहे.

  • पीओपीच्या 20 किलोच्या गोणीमागे 50 ते 100 रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी 300 ते 350 रुपयांना मिळणारी गोणी यावर्षी 400 रुपये झाली आहे.
  • 25 किलो शाडूचे पोते 200 रुपयांना मिळत होते ते आता 250 रुपये झाले आहे.
  • 50 किलो काथ्याची किंमत 3 हजार रुपये होती. ती आता 3500 रुपये झाली आहे.
  • रंगाचे दर 30 टक्क्यांनी वाढले आहे. गतवर्षी 20 लिटर रंगाची बकेट 4 हजार रुपये होती. तीच बकेट आता 7 हजार रुपयांवर गेली आहे.
  • सोनेरी रंग 1500 रुपये किलो होता तो आता 2 हजार रुपये झाला आहे.

पेणच्या गणेश मूर्तीना जीआय मानांकन

आपल्या आकर्षक कलाकृतीने गणपतींना सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या पेणच्या मूर्तिकारांचा गौरव करण्यात आला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते या मूर्तिकारांना जीआय मानांकन प्रमाणपत्र देऊन सन्मान केला आहे. त्यामुळे आता पेणचे गणपती सांगून होणारी फसवणूक थांबणार आहे. रायगड जिल्ह्यातील पेण हे गणपती मूर्तीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथे तयार करण्यात येणाऱ्या गणपती मूर्ती सुबक असतात तसेच मूर्तीचे रंगकामदेखील चांगले असते. त्यामुळे येथील गणपती मूर्तीना राज्याबरोबरच परदेशातदेखील प्रचंड मागणी आहे. याचाच फायदा घेऊन जिल्ह्यासह राज्यातील अनेक गणेश मूर्तिकार पेणचे गणपती सांगून भक्तांची फसवणूक करतात. ही फसवणूक टाळण्यासाठी गणपती मूर्तीना जीआय मानांकन मिळवण्याचा प्रस्ताव जीआय नोंदणी कार्यालयाकडे पाठवला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असून पेणच्या गणपतीं मूर्तीना भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र मिळाले आहे.