
आसाममध्ये गेंड्यांच्या शिकारीला, तस्करीला आळा घालण्यासाठी आसाम सरकारने तस्करांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचा कायदा केला आहे. या कायद्याच्या धर्तीवर राज्यातही अशा प्रकारचा कठोर कायदा करता येईल का, याचा आढावा घेतला जाईल, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत दिले.
राज्यात वाघांची तस्करी सुरू असून टिपेश्वर अभयारण्यातील पिसी वाघिणीची तस्करी करण्यासाठी तिच्या गळ्यात तारेचा फास अडकल्याची घटना ताजी असताना आता पवणार येथे पीकेडी-टी33च्या या वाघिणीच्या गळ्यातही अशा प्रकारचा फास आढळला. आसाममध्ये गेंड्यांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी तस्करांविरोधात जसे शूट अॅट साईटची ऑर्डर देण्यात आली आहे, कायदा बनवण्यात आला आहे त्याचप्रमाणे राज्यातील प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी आसामसारखा कायदा राज्य सरकार आणणार आहे का, असा प्रश्न सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी लक्षवेधी मांडून केला. त्याला वनमंत्री गणेश नाईक यांनी उत्तर दिले.
सैन्य दलातील लोक तस्करीत गुंतले आहेत
हा वाघांच्या अपघातांचा विषय नसून हा वाघांची शिकार आणि त्यांच्या तस्करीचा विषय आहे. या तस्करीत आता सैन्य दलातील लोकही गुंतले असून त्यामुळे हा विषय अधिक गंभीर झाला आहे. त्यामुळे यावर आसामप्रमाणे कायदा असावा, अशी मागणी अनिल परब यांनी केली.