
ठाण्यातील जनता दरबारावरून मिंधे गटाची आदळआपट सुरू असतानाच वन मंत्री गणेश नाईक यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना नवी मुंबईत जनता दरबार घ्यावेत, अशी गुगली टाकली. निवडून आल्यानंतर आमदार आणि मंत्री हा फक्त एका मतदारसंघाचा नसतो तर तो संपूर्ण राज्याचा असतो. तो सर्वच मतदारसंघांचे प्रश्न मांडू शकतो. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी ठाण्यात जनता दरबार घेणार आहे. त्याच धरतीवर शिंदे आणि पवार यांच्या मंत्र्यांनीही जनता दरबार घ्यावेत. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न तिप्पट वेगाने सुटतील, अशीही कोपरखळी नाईक यांनी जनता दरबाराला विरोध करणाऱ्यांना लगावली.
गणेश नाईक हे उद्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबार घेणार आहेत. याबाबत पत्रकारांनी त्यांना छेडले असता ते म्हणाले की, निवडून येईपर्यंत आमदार हा एका पक्षाचा असतो. मात्र एकदा निवडणूक झाली की आमदार आणि मंत्री हे संपूर्ण राज्याचे होतात. मी जरी वन मंत्री असलो तरी माझ्याकडे अन्य विभागाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना मी मदत करू शकतो. माझ्या कार्यालयामार्फत या तक्रारी संबंधित विभागाकडे जाऊ शकतात. त्यामुळे मी ठाणे शहरात जनता दरबार घेणार आहे. मी जसा – ठाण्यात जनता दरबार घेणार आहे. तसाच जनता दरबार एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मंत्र्यांनी पालघर आणि नवी मुंबईत घ्यावेत. माझी काहीच हरकत नाही. उलट नागरिकांच्या समस्या लवकर सुटतील. नवी मुंबईत मी सुरुवातीला पंधरवाड्याला जनता दरबार घेणार आहे, असेही नाईक यांनी या वेळी स्पष्ट केले.