
लोकसभा निवडणुकीत पुत्र श्रीकांत शिंदे यांना फायदा व्हावा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत कोंबलेली 14 गावे वनमंत्री गणेश नाईक यांनी नाकारली आहेत. नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यासाठी काढलेला अध्यादेश रद्द करण्याची मागणी केली आहे. नाईक यांच्या या भूमिकेमुळे मिंधे गट मात्र अस्वस्थ झाला आहे.
कल्याण तालुक्यात असलेली १४ गावे पूर्वी नवी मुंबई महापालिकेत होती. मात्र मालमत्ता कराचा भार पडल्यामुळे ही गावे महापालिकेतून बाहेर पडली. त्यानंतर या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा जीआर काढला गेला. याच भागातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे निवडणूक लढवत होते. अपशकुन नको म्हणून त्यांच्या या निर्णयाला मी विरोध केला नाही. मात्र नवी मुंबईकरांवर आर्थिक भार टाकून ही गावे जर महापालिकेत घेतली जात असतील तर त्याला सर्वांचाच विरोध आहे. या गावांचा समावेश करण्यासाठी पालिका प्रशासनाने शासनाकडे सुमारे साडेसहा हजार कोटींची मागणी केलेली आहे. गावातील अतिक्रमणे शासनाने हटवावीत आणि साडेसहा हजार कोटींचा निधी पालिकेला द्यावा. त्यानंतरच या गावांचा नवी मुंबईत समावेश करण्यात यावा असेही गणेश नाईक यांनी स्पष्ट केले आहे.
….तर नवी मुंबई देशात ३३३ क्रमांकावर जाईल
नवी मुंबई हे महाराष्ट्रात प्रथम आणि देशात तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. हे मानांकन आणखी उंचावण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही भंगार अधिकाऱ्यांनी असे निर्णय घेतल्याने शहराच्या विकासाला मोठी खीळ बसणार आहे. जर असेच चालत राहिले तर देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेले शहर थेट ३३३ क्रमांकावर जाईल, असा संतापही गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे.