शिंदेंच्या साताऱ्यातील जल पर्यटन ड्रीम प्रोजेक्टचे काम थांबवले, एकनाथावर गणेशाचा कोप

सातारा जिह्यातील मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन प्रकल्प उभारणीचे काम मिंधे सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केले होते. या प्रकल्पासाठी कोणतीही परवानगी न घेता काम रेटणाऱ्या एकनाथावर गणेशाचा कोप झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या या प्रकल्पाचे काम थांबविण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत.

ग्रामीण भागात पर्यटन व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने मुनावळे येथे जल पर्यटन प्रकल्प राबिण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मागील वर्षी मार्च महिन्यात उद्घाटन करण्यात आले होते, मात्र प्रकल्पाच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्याच घेण्यात आल्या नसल्याचे उघडकीस आले आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी याची गंभीर दखल घेत काम थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुख्य वनरक्षक यांनी लेखी आदेश काढले आहेत.

मुनावळे हे ठिकाण केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पर्यावरण व जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ‘इकोसेन्सिटिव्ह झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणतेही पर्यटन प्रकल्प राबवताना वन आणि पर्यावरण विभागाशी संबंधित विविध प्रकारच्या 16 परवानग्या आवश्यक आहेत, मात्र सद्यस्थितीत मुनावळे येथील जल पर्यटनाच्या प्रोजेक्टला कोणत्याही विभागाची परवानगी नाही.

प्रकल्पाला या प्राधिकरणांची परवानगीच नाही

वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय भारत सरकार, केंद्रीय वन्य जीव मंडळ, राज्य वन्य जीव मंडळ, स्थानिक सल्लागार समिती सह्याद्री व्याघ्र राखीव, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोयना जलसंपदा विभाग, स्थानिक ग्रामपंचायत या प्राधिकरणांच्या 16 ना हरकत परवानग्याच प्रकल्प सुरू करताना घेतलेल्या नाहीत.

कोयना धरणातील शिवसागर जलाशयात मुनावळे येथे जल पर्यटनाच्या प्रकल्पाचा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला होता. मात्र फडणवीस सरकारने हा प्रकल्पाचे काम थांबवून शिंदेंना धक्का दिला आहे.