
ठाण्यातला अंधार हटवण्याकरिता आम्ही उजेड घेऊन आलो आहे. उजेड आल्यानंतर आपोआपच अंधार नाहीसा होईल असे सूचक वक्तव्य करून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मिंध्यांना पुन्हा डिवचले आहे. त्यामुळे नाईक विरुद्ध मिंधे असा पुन्हा सामना होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. आम्ही चेहऱ्यावर भाव दाखवत नाही तर आनंदाचे भाव मनामध्ये राहिले पाहिजेत असा टोलादेखील लगावला.
ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली 72 वी पुरुष श्री कृष्ण करंडक व महिला गटासाठी स्व. पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा-2025 चे उद्घाटन गणेश नाईक यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी नाईक यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली.
गेल्या अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्ष काही कमी होताना दिसत नाही. सुरुवातीला ठाण्यातील जनता दरबारावरून भाजप आणि शिंदे गटात जोरदार घमासान झाले. त्यानंतर नवी मुंबईत 14 गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यावरून नाईकांनी मिंध्यांना थेट अंगावर घेतले होते. दरम्यान, वनमंत्री गणेश नाईक ठाण्यात येऊन मिंधे गटाला आव्हान देण्याची एकही संधी सोडत नसल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हा संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे बोलले जाते.
नवी मुंबईत कचऱ्याची समस्या नाही
वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ठाण्यातील कचरा समस्येविषयी त्यांना छेडले असता ते म्हणाले, सर्व महानगरांमध्ये आणि मुंबईत कचऱ्याची समस्या आहे. फक्त आमच्या नवी मुंबईत कचऱ्याची समस्या नाही, कारण नवी मुंबईच्या विकासाचा आराखडा आणि नियोजन आम्ही केले आहे असे सांगत ठाणे शहरातील कचऱ्याचा प्रश्नावर त्यांनी अप्रत्यक्षरीत्या पालिकेवर टीका केली. तसेच ठाणे जिल्ह्याचा मी तीन वेळा पालकमंत्री होतो. त्यामुळे शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.