बाप्पांच्या विसर्जनासाठी धर्मयुद्ध! पालिकेचा कृत्रिम तलावाचा पर्याय धुडकावून मिरवणुका निघाल्या

प्रदूषणाचे कारण सांगून पीओपी गणेशमूर्तींचे समुद्रात विसर्जन करण्यास महापालिका आणि सरकारने मनाई केली असली तरी गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रातच करणार, असा निर्धार करत गणेश मंडळांनी आज पुन्हा वाजतगाजत, जल्लोषात बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढली. कृत्रिम तलावात विसर्जन करून गणपतीची विटंबना कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मंडळांनी घेतली असून कांदिवली, चारकोप भागात मिरवणुकीला हजारो भाविकांची गर्दी उसळली आहे.

माघी गणेश जयंतीच्या आदल्या दिवशी महापालिकेने गणेश मंडळांना नोटिसा पाठवून पीओपीच्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करता येणार नाही, असे सांगितले. मंडपात मूर्ती आल्या आणि दुसऱ्या दिवशी पूजन होणार असताना ही नोटीस हाती पडल्याने मंडळांकडे कोणताच पर्याय राहिला नाही. माघी गणेशोत्सव मोठय़ा थाटामाटात साजरा केला गेला. उंच मूर्ती असल्याने त्यांचे विसर्जन समुद्रातच व्हायला हवे अशी भूमिका मंडळांनी घेतली. आज दहा दिवसांनी मुंबई उपनगरांतील अनेक मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पुन्हा निघाल्या.

कांदिवलीच्या महावीर नगरातील कांदिवलीचा श्री गणेशोत्सव मंडळाने कोणत्याही परिस्थितीत मूर्तीचे विसर्जन समुद्रातच करण्याचे ठरवून मिरवणूक काढली. मंडळाचे यंदाचे माघी गणेशोत्सवाचे तेरावे वर्ष असून सुमारे 12 फूट उंच गणेशमूर्ती आहे.

 ‘चारकोपचा पेशवा’ या बाप्पाची मिरवणूक सातव्या दिवशी निघाली होती. मात्र विसर्जनाला मनाई करण्यात आल्याने मूर्ती माघारी नेण्यात आली. या बाप्पाची आज दुपारी पुन्हा मिरवणूक निघाली. त्यासह या भागातील आणखी चार मूर्तीही मिरवणुकीने निघाल्या.

…तर मूर्ती माघारी आणणार

12 फूट उंच गणपती कृत्रिम तलावात कसा  विसर्जित करणार? विसर्जन करणारे कामगार मूर्ती कशीही उचलतात आणि पाण्यात बुडवतात. ती विटंबना आम्हाला करायची नाही. आम्हाला समुद्रात विसर्जन करू दिले नाही तर मूर्तीवर पाणी शिंपडून आम्ही ती पुन्हा होती त्या ठिकाणी आणून ठेवणार आणि जेव्हा न्यायालयाची परवानगी मिळेल तेव्हा विसर्जित करणार. कांदिवली चारकोपमधील चार मंडळांच्या मूर्ती अशाच समुद्रावर अडवून परत पाठवण्यात आल्या. – सागर बामणोलीकर, खजिनदार, ‘कांदिवलीचा श्री’ गणेशोत्सव मंडळ

 

कांदिवलीत दंगल नियंत्रण पथक तैनात

गणेशमूर्तींचे विसर्जन होणार की नाही याबाबत रात्री उशिरापर्यंत संभ्रम होता. कांदिवलीतील हिंदुस्थान नाका  भागात पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र पडसाद, सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार?

मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या मुद्दय़ावरून वातावरण तापले. मंत्री आशीष शेलार यांनी गणेश विसर्जनाचा मुद्दा उपस्थित करत विसर्जनास आडकाठी करणारे प्रशासन भोंग्यांबाबत न्यायालयाच्या निर्णयाचे पालन का करीत नाही, असा सवाल केला. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीओपी मूर्तींबाबत मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. निकालाचा सविस्तर अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका त्यांनी मांडली.