मुंबईतील ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गेल्या दहा वर्षांत गणेशोत्सव साजरा करताना नियम-अटी पाळल्या आहेत, त्यांना सलग आणि सरसकट पाच वर्षे परवानगी द्यावी, अशी मागणी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. याबाबत पालिकेने कोणत्याही अटी घालू नयेत अशी मागणीही मंडळांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिका आयुक्तांना पत्र देऊन समन्वय समितीच्या मागणीबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.
नियम व अटी पाळणार्या मंडळांना सलग पाच वर्षे परवानगी देण्याची घोषणा पालिकेने केली असली तरी पोलीस आणि वाहतूक विभागाची परवानगी घ्यावी व स्वयंघोषित अॅफेडेव्हिट द्यावे, आदी अटी घातल्या आहेत. याबाबत पालकमंत्री आणि समन्वय समितीची सोमवारी बैठक झाली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने गणेशोत्सव मंडळांना मंडपाच्या भाड्यात 50 टक्के सवलत, नि:शुल्क अग्निशमन सेवा मिळणार आहे. तर मंडळांना आता मुंबईतील दहा वर्षे व त्यापेक्षा अधिक वर्षे झालेल्या मंडळांचे आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे कार्यालय यांना मालमत्ता करात 50 टक्के सवलत द्यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात दिले आहेत.