गणेश विसर्जनामागील काय आहे प्रथा; जाणून घ्या सविस्तर…

>>योगेश जोशी

गणाधिपती…गणराज…गणनायक अशा अनेक नावांनी आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा ओळखले जातात. आपल्या संस्कृतील चैत्रपाडवा म्हणजेच गुढीपाडव्यापासून ते फाल्गुन हुताशनी पोर्णिमा म्हणजेच होळीपर्यंत अनेकसण साजरे करण्यात येतात. या सर्व पूजा आणि गणेशोत्सव यात मोठा फरक आहे. सर्व पूजांमध्ये आवाहन केलेल्या देवतांना तुम्ही आमच्यावर कृपादृष्टी ठेवावी आणि स्वस्थानी परत जावे, असे आवाहन करत उत्तरपूजा करण्यात येते. तर गणेश पुजनात उत्तरपूजा झाल्यावर गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यात येते. गणराय बाप्पांच्याच विसर्जनाची प्रथा काय आहे जाणून घेऊया…

गणेशाचे निवासस्थान म्हणजे कैलास पवर्त…कैलास पर्वतावर श्रीगणेशाचा निवास असल्याची मान्यता आहे. महादेव नेहमी समाधीत असतात. तर पित्याशी मतभेद झाल्याने कार्तिकेय कैलास पर्वत सोडून दक्षिण हिंदुस्थानात आल्याबाबतच्या अनेक पौराणिक कथा आहेत. त्यामुळे आपल्याजवळ राहील आणि आपल्या सर्व आज्ञांचे पालन करेल, असा पुत्र असावा, या पार्वतीमातेच्या इच्छेने श्रीगणेशाचा जन्म झाला. ही कथा आपल्याला माहिती आहे. पार्वतीमातेच्या इच्छेनुसार श्रीगणेश 10 दिवस भक्तांचा पाहुणाचार स्विकारून पुन्हा स्वगृही कैलास पर्वतावर जातात, अशी मान्यता असल्याने फक्त गणरायाचे विसर्जन करण्याची मान्यता आहे.

श्रीगणेशाने महर्षी व्यास यांच्या विनंतीनुसार महाभारत लेखनाचे कार्य केले. ते 10 दिवस सुरू होते. या काळात गणेशाच्या शरीराचे तापमान वाढत असल्याने व्यासांनी गणेशाच्या शरीरावर मातीचा लेप दिला आणि लेखनाचे कार्य झाल्यावर गणेशाच्या शरीरावरील मातीचा लेप निघावा, यासाठी त्यांनी गणेशावर पाणी टाकले, या मान्येतनुसारही गणेशमुर्तीचे विसर्जन करण्याची प्रथा रुढ झाली.

आपल्या संस्कृतीत अनेक गोष्टी प्रतीकरुपाने सांगण्यात आल्या आहेत. आपल्यातील विकृतींचा त्याग करण्यासाठी या काळ योग्य असतो. निसर्गात यावेळी सकारात्मक उर्जा असते. मोदक म्हणजे मोह आणि मद यांचा त्याग करावा, गणरायांनी कुबेराचा अहंकार नष्ट केला. तसेच अनेक दैत्यांचा संहार केला, त्याप्रमाणे आपल्यातील विकृती नष्ट करून आपल्यावरील विघ्न दूर करण्याचे सामर्थ्य विघ्नहर्ता गणरायातच आहे. त्यामुळे या 10 दिवसात सृष्टीतील विकृती नष्ट करत सृष्टीला सकारात्म क उर्जा विघ्नहर्ता गणराय देत असतात. त्यामुळे गणरायाचे आगमन आणि त्याचे विसर्जनाची प्रथा रुढ झाल्याचे सांगण्यात येते.

महाराष्ट्रासह दक्षिण हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणात गणेशमुर्ती स्थापन करून त्यांचे विसर्जन करण्यात येते. तर उत्तर हिंदुस्थानात सुपारी किंवा गणेशप्रतीमेच पूजन होते. गणरायाची महाराष्ट्रात प्रसिद्ध स्थाने आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या स्वयंभू मुर्ती आहेत. त्यामुळे कैलास पर्वताहून ते भक्तांच्या भेटीसाठी येतात. त्यानंतर पुन्हा स्वगृही कैलासात परततात, तसेच दक्षिण हिंदुस्थानात ते मोठा भाऊ कार्तिकेय याच्याकडे पाहुणचारासाठी जातात, अशी मान्यता असल्याने दक्षिण हिंदुस्थानात कार्तिकेय म्हणजेच अयप्पा स्वामी आणि श्रीगणेशाचे महत्त्व आहे. तसेच उत्तर हिंदुस्थानातच कैलास पर्वत असल्याने तेथे फक्त सुपारी किंवा प्रतिमेच्या स्वरुपात गणेशपुजानाची परंपरा असल्याची मान्यता आहे. गणेश स्थापना आणि विसर्जन याबाबत अशा विविध मान्यता आहेत