150 वर्षांची अखंडित परंपरा, दापोलीतील रेमजे कुटुंबाने साकारला पन्हाळेकाजी लेण्यांचा कल्पक देखावा

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. गणेशाच्या स्वागतासाठी अनेक मंडळांनी आकर्षक देखावे साकारले आहे. घराघरामध्ये कल्पक डेकोरेशन करण्यात आलेले आहेत. दापोली शहरातील वडाचा कोंड येथील रेमजे परिवाराकडून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. गेल्या 150 वर्षापासूनची सुरू असलेला गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आजही त्याच आनंदी आणि उत्साहाच्या भावनेने अखंडपणे सुरू आहे.

दापोली वडाचा कोंड येथील रेमजे परिवार प्रचंड मोठा परिवार आहे. त्यांचे गौरी गणपती सणाच्या उत्सवातील एकत्रितपणाचे सख्य हे आजही कायम आहे. अशा या रेमजे परिवाराकडून दरवर्षीच विविध प्रकारचे समाज परिवर्तनाच्या प्रबोधनाचे सामाजिक देखावे श्रींच्या सजावटीत साकारले जातात. तशाच प्रकारे यावर्षी पन्हाळेकाजी येथील सुप्रसिद्ध लेण्यांचा देखावा साकारून प्राचीन पुरातन संस्कृतीचा अनोखा नजारा सर्व गणेश भक्तांना पाहण्यासाठी दापोली शहरातच उपलब्ध करून दिला आहे.

रेमजे परिवातील अमित रेमजे हे उत्कृष्ट कलाकार आहेत. आजवर त्यांनी विविध सामाजिक समस्या विविध ठिकाणच्या रंगावली प्रर्दशनात रांगोळीद्वारे रेखाटून अगदी राज्यस्तरावर कलाप्रेमींची दाद मिळवली आहे. याच अमित रेमजे यांच्यासह विजय, पंकज, सिध्देश, रुपेश रेमजे परिवारातील सदस्यांच्या मेहनतीने अगदी हुबेहूब पन्हाळेकाजी लेणी देखाव्यात साकारली आहेत. हा देखावा पाहण्यासाठी केवळ दापोली तालुक्यातीलच नव्हे तर खेड मंडणगड चिपळूण गुहागर तालुक्यातील कलाप्रेमींची रिघ लागली आहे. लेणी पाहील्यानंतर त्यांना मिळणारी शाबासकिच्या कौतुकीची दाद हीच त्यांच्या कलेची पोच पावती आहे.