
>> गणेश आचवल
एप्रिल, मे महिना म्हटलं की सुट्टय़ांचा महिना आणि या सुट्टय़ांच्या महिन्यात ‘अलबत्या गलबत्या’, ‘राजा सिंह’, ‘निम्मा शिम्मा राक्षस’, ‘कापूसकोंडय़ाची गोष्ट’ अशी अनेक नाटके तुम्ही पाहिली असतील. या सर्व नाटकांचा संगीतकार म्हणून परिचयाचे झालेले एक नाव म्हणजे मयुरेश माडगावकर!
मयुरेश माडगावकर हा उत्तम पेटीवादक, गायक, संगीत शिक्षक आणि संगीतकार म्हणून गेल्या वीस वर्षांपेक्षा अनेक वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहे. मयुरेशचे वडील सुनील माडगावकर आणि आई पुष्पा माडगावकर यांचे शास्त्राrय संगीत प्रशिक्षणाचे वर्ग आहेत. त्यांच्याकडूनच मयुरेशने सुरुवातीचे गायनाचे प्रशिक्षण घेतले. डहाणूकर कॉलेजमध्ये असताना मयुरेश सुरुवातीला एकांकिकांमध्ये अभिनय करायचा. तसंच एखाद्या वेळी संगीतकार आला नाही तर त्या एकांकिकेसाठी पेटी किंवा तबला वादनही तो करायचा. स्वरांचे ज्ञान पक्के असल्याने मयुरेशला पेटी, तबला, कीबोर्ड ही वाद्येसुद्धा उत्तम वाजवता येत होती. विकास भाटवडेकर यांच्याकडून मयुरेशने सुगम संगीताचे शिक्षण घेतले आहे, तर मनोहर जोशी आणि मधुसूदन आपटे यांच्याकडूनही त्याने शास्त्राrय संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे.
एका एकांकिका स्पर्धेसाठी अचानक संगीत देण्याची जबाबदारी जयवंत वाडकर यांनी मयुरेशवर सोपवली आणि त्याने ती यशस्वी करून दाखवली. मग पुढे एकांकिकांचा संगीतकार म्हणून मयुरेश काम करू लागला. मुंबई विद्यापीठाचा अनिल मोहिले यांचा संगीत संयोजन आणि संगीत दिग्दर्शनाचा अभ्यासक्रमही त्याने पूर्ण केला आहे. ‘एक लफडं विसरता न येणारं’ हे त्याने संगीत दिलेलं नाटक खूप यशस्वी झालं आणि त्यासाठी त्याला अनेक पारितोषिकेसुद्धा मिळाली. त्याने संगीत दिलेलं ‘राजा सिंह’ हे बालनाटय़ दिल्ली येथे बालरंगभूमी महोत्सवात सादर झालं. ‘घरबार’, ‘समुद्र’ या नाटकांनाही त्याने संगीत दिले. पार्ले येथील महिला संघ हायस्कूलमध्ये अनेक वर्षे तो संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होता.
गेली काही वर्षे दादरच्या आयईएस ओरायन हायस्कूलमध्ये तो संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शालेय विद्यार्थ्यांना संगीत शिकवताना पेटी, तबला या वाद्यांना साथ कायम करावी लागते आणि त्यामुळे रोजचा रियाज हा शाळेत आपोआपच होत असतो. शिवाय मुलांना संगीत कलेची, वाद्य वादनाची आवड निर्माण व्हावी यासाठीदेखील तो प्रयत्नशील असतो. बालनाटय़ांना संगीत देताना लहान मुलांना कोणत्या प्रकारचा ध्वनी आकर्षित करतात याचा विचार होणं महत्त्वाचं असल्याचं तो मानतो. दादर येथील आयईएस ओरायन हायस्कूलने हिंदुस्थानी शास्त्राrय संगीत हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला असून असा उपक्रम करणारी ही महाराष्ट्रातील पहिली शाळा आहे. नुकतीच या शाळेतर्फे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ ही आंतरशालेय समूहगीत स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या आयोजनात मयुरेशचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. तसेच शाळेतील मुलांना मयुरेशने संगीतबद्ध केलेले समूहगीत युनेस्कोच्या एका प्रोजेक्टमध्ये सादर करण्याची संधी मिळाली. आयईएस शाळेचे व्यवस्थापन, शाळेच्या प्रिन्सिपल डॉ. प्रतिभा प्रभू आणि शाळेच्या सर्व सहकाऱयांकडून मिळणाऱया सहकार्यातून मयुरेशच्या नवीन कल्पनांना उत्तम प्रतिसाद मिळतो व विद्यार्थ्यांमध्ये संगीत कलेची आवड निर्माण करण्यात तो यशस्वी होतो. सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून त्याला अनेक वेळा झी गौरव पुरस्कार, राज्य नाटय़ स्पर्धेतील पुरस्कार मिळाला आहे.