गानप्रभा हृदयेश फेस्टिव्हलमध्ये शास्त्रीय संगीताची पर्वणी; विलेपार्ले येथे 12 ते 14 जानेवारीदरम्यान आयोजन, पं. सत्यशील देशपांडे यांचा संगीत सेवाव्रती पुरस्काराने गौरव

गानप्रभा हृदयेश फेस्टिव्हल यंदा 12 ते 14 जानेवारीला विलेपार्ले पूर्व येथील पार्ले टिळक विद्यालयाच्या प्रांगणात रंगणार आहे. पं. कुमार गंधर्व यांचे शिष्य व ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सत्यशील देशपांडे यांचा या महोत्सवात ‘संगीत सेवाव्रती’ पुरस्काराने ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. एक लाख रुपये व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे,

गानप्रभा हृदयेश फेस्टिव्हलमध्ये पंठसंगीत व वाद्यसंगीत अशा दोन्ही प्रकारांतील अभिजात संगीत ऐकण्याची पर्वणी मिळणार आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गानप्रभा डॉ. प्रभा अत्रे यांची मैफल हे या स्वरसोहळ्याचे प्रमुख आकर्षण आहे. तसेच, ज्येष्ठ व्हायोलिनवादक एल. सुब्रमण्यम यांचे वादन व शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांची प्रभात मैफल हीदेखील सोहळ्याची वैशिष्टय़े आहेत.

युवा कलाकारांना मिळणार प्रोत्साहन

यंदाच्या महोत्सवापासून युवा कलाकारांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती हृदयेश आर्टसचे अविनाश प्रभावळकर यांनी दिली. पं. कुमार गंधर्व तसेच, पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दीचे वर्षानिमित्त कलापिनी कोमकली व भाग्येश मराठे यांचे गाणे होईल.

असा रंगणार स्वरसोहळा

12 जानेवारी रोजी संध्याकाळी 6.15 वाजता राहुल शर्मा यांचा संतूर वादनाचा कार्यक्रम होईल. जसरंगी सहगायन डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे व पं. संजीव अभ्यंकर करणार आहेत. 13 जानेवारीला संध्याकाळी 5.30 वाजता एस. आकाश (बासरी) आणि यज्ञेश रायकर (व्हायोलिन) कलापिनी कोमकली (गायन), नीलाद्री कुमार (सतार) यांचे सादरीकरण होईल. 14 जानेवारी सकाळी 6.30 वाजता कौशिकी चक्रवर्ती यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल. तर संध्याकाळी 5.30 वाजता भाग्येश मराठे (गायन), डॉ. एल सुब्रमण्यम (व्हायोलिन) डॉ. प्रभा अत्रे (गायन) यांचा परफॉर्मन्स होईल.