उद्या वाजतगाजत गणपतीबाप्पांना निरोप, रत्नागिरीत 37 हजाराहून अधिक घरगुती गणपतींचे विसर्जन

गेले दहा दिवस कोकणात मंगलमय वातावरणात गणेशोत्सव साजरा होत आहे. उद्या अनंतचतुर्दशी दिवशी वाजतगाजत गणपतीबाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. उद्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 37 हजार 805 घरगुती गणपती आणि 65 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होणार आहे. विसर्जनानिमित्त पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

7 सप्टेंबर रोजी गणपतीबाप्पाचे वाजतगाजत आगमन झाले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1 लाख 66 हजार 867 घरगुती गणपती आणि 122 सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली. गेले दहा दिवस कोकणात मंगलमय वातावरणात गणपतीची पुजाअर्चा सुरु आहे. भजन, जाखडी गावोगावी साजरी केली जात आहे. घरच्या गणपतीसाठी चाकरमानीही मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल झाले आहेत. गौरी-गणपती विसर्जनानंतर काही चाकरमानी मुंबईकडे परतले आहेत. उद्या दुपारनंतर वाजतगाजत गणपतीबाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणूका निघणार आहेत. रत्नागिरी शहरामध्ये मांडवी आणि भाट्ये समुद्रकिनारी गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन केले जाते. या विसर्जन सोहळ्याला नागरीकांची मोठी गर्दी होते.