Photo – गण… गण… गणात.. बोते…! ‘श्रीं’चा प्रकट दिन उत्साहात साजरा

संतनगरी शेगावात श्रींचा 147 वा प्रगट दिन महोत्सव टाळ मृदंगाच्या निनादात व भाविक भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

श्रींच्या प्रगट दिन उत्सवात 1001 भजनी दिंड्यांनी सहभाग घेतला तर सुमारे एक लाखांच्या वर भाविक भक्तांनी महाजारांचे दर्शन घेतले.

श्रींच्या प्रगट दिन उत्सवाला 13 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. गुरुवारी 20 फेब्रुवारी श्रींच्या प्रगट दिनी 10 वाजता महारुद्र स्वाहाकार यज्ञयागाची पूर्णाहूती झाली.

नंतर सकाळी 10 ते 12 दरम्यान हभप भरत बुवा पाटील यांचे कीर्तन झाले व हजारो भाविकांनी भक्ती भावाने पुष्पवृष्टी करून श्रींचा 147 वा प्रगट महोत्सव साजरा केला. नंतर श्रींची महाआरती करण्यात आली.

दुपारी 4 वाजता श्रींच्या प्रगट दिन उत्सवानिमित्त अश्व, रथ, मेण्यासह श्रींची पालखी काढण्यात आली. यात पताकाधारी, टाळकरी, वारकरी व हजारो भाविक भक्त मंडळी सहभागी झाले होते.

श्रींची पालखी मंदिराय सायंकाळी 7 वाजता पोहोचली. त्यानंतर महाआरती व वारकर्‍यांचा रिंगण सोहळा पार पडल व नंतर श्रींच्या पालखी परिक्रमेची सांगता झाली.

पालखी परिक्रमा दरम्यान संपूर्ण पालखी मार्गावर रंगीबेरंगी रांगोळी काढण्यात आली होती. श्री गजानन भक्त मंडळाकडून ठीक ठिकाणी भक्तांना महाप्रसाद, चहापाणी व सरबताचे वाटप करण्यात आले होते.

श्रींच्या मंदिरात ठिकठिकाणी रंगबिरंगी आकर्षक फुलांची सजावट मुख्य गेटवर तसेच सर्व मंदिर परिसरात केळीचे खांब व आंब्याच्या पानांचे तोरणे लावण्यात आले होते. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.