
ठाण्याचे सांस्कृतिक वैभव असलेल्या गडकरी रंगायतनची तिसरी घंटा लवकरच घणघणणार आहे. वर्षभरापासून दुरुस्तीसाठी बंद असलेले हे नाट्यगृह महाराष्ट्रदिनी रसिक प्रेक्षकांसाठी खुले होणार आहे. नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून नव्या ढंगात नाट्यगृह ठाणेकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. त्यामुळे कलाप्रेमींची प्रतीक्षा संपणार आहे.
ठाण्याची ‘चौपाटी’ असलेल्या मासुंदा तलावाच्या काठावर 1978 मध्ये राम गणेश गडकरी रंगायतन बांधण्यात आले होते. रंगायतनची 2005 मध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती केली गेली. त्यानंतर आता म्हणजे 2024-25 मध्ये तब्बल 18 वर्षांनी नूतनीकरण केले जात आहे. रंगायतनची आसन क्षमता 1 हजार 80 एवढी आहे. अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आता नव्याने तयार होत असलेल्या रंगायतनच्या खुर्यादेखील बदलल्या गेल्या आहेत. पूर्वी आखूड खुर्चा होत्या. त्यामुळे बसण्यासही रसिकांना त्रास होत होता. हाच मुद्दा लक्षात घेऊन आता येथे आरामदायी खुर्चा बसवण्यात आल्या आहेत. मात्र नव्या आसन व्यवस्थेत 120 खुर्चा कमी झाल्या असून ती संख्या आता 960 पर्यंत आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅप्सूल लिफ्ट
ज्येष्ठ नाट्यरसिकांना पायऱ्या चढताना त्रास होतो. याकरिता पारदर्शक पद्धतीचे कॅप्सूल लिफ्ट उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यातून वर खाली करताना लिफ्टच्या आतील आणि बाहेरील दृश्य पाहता येणार आहे. त्याचबरोबर नाट्यगृहात अत्याधुनिक स्वरुपाचे स्पिकर बसवले जाणार आहेत. गडकरी रंगायतनचा पडदा 47 वर्षांनी बदलण्यात येणार आहे. याशिवाय खिडक्यांची संख्या वाढवून ती संख्या 6 वर नेण्यात आली आहे. तसेच खालील बाजूस आणखी दोन टॉयलेट वाढवण्यात आले आहेत. 1 मे रोजी नाट्यगृह सुरू होईल, अशी माहिती पालिका उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली.