मल्चिंग पेपरवर तरारु लागला भाजीपाला, गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांचा वाढता कल

>> संतोष नाईक

कमी पाण्यात जास्त उत्पादन, तणांची रोखता येणारी वाढ, कीड व रोगांवर नियंत्रण ठेवता येणे शक्य असल्याने गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरीवर्ग भाजीपाला पिकांसाठी मोठ्या प्रमाणात ‘मल्चिंग पेपर’चा वापर करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सध्या हे मल्चिंग पेपर शेतकऱ्यांना भाजीपाला पिकासाठी वरदान ठरत आहे.

गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागात नदीकाठावरील, तसेच तेरणी, हलकर्णी, नूल, बसर्गे, खणदाळ, मनवाड, कवळीकट्टी या परिसरातील शेतकरी प्रामुख्याने ढोबळी मिरची, बटका मिरची, काळी मिरची, टोमॅटो, बेल बिनस, कांदा, काकडी, दोडका, वांगी आणि मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिके घेतात. सध्या ढोबळी मिरची व टोमॅटो पिकांवर जास्त भर दिल्याचे दिसत आहे. कारण आता लावलेले पीक हे मे व जून महिन्यांदरम्यान येत असल्यामुळे त्याला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

या परिसरातील भाजीपाला गडहिंग्लज, कोल्हापूर, बेळगाव, संकेश्वर यांसह विविध बाजारपेठांमध्ये पाठविला जातो. बऱ्याचदा बाजारात दरांमधील चढ-उतारामुळे शेतकरीवर्गाला नुकसानदेखील सोसावे लागते. भाजीपाल्यासाठी शेती तयार करण्यापासून ते काढण्यासाठी मजूर, औषधफवारणी, वेळेत पाणी देणे आदी कामांसाठी होणारा खर्च व प्रत्यक्ष निघणारे उत्पादन यावरच शेतकऱ्यांचे नफा-तोट्याचे गणित अवलंबून असते. त्यामुळे सध्या शेतकरीवर्ग पारंपरिक शेतीतून बाहेर पडत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केल्या जाणाऱ्या शेतीकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. यांत्रिकीकरणामुळे बैलजोड्यादेखील कमी होताना दिसत आहेत.

सध्या सर्वत्र भाजीपाला पिके घेण्यासाठी शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात मल्चिंग पेपरचा वापर करीत आहे. हे पेपर्स जमिनीवर अंथरल्याने पिकाला पाणी कमी लागते, तण उगवत नाही, पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते. पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढून रोग व किडींपासून बचाव होतो. जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवता येते. परिणामी, जमिनीतील आर्द्रता टिकून राहते. आवश्यक पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळत असल्याने पिकांची वाढ चांगली होते. या कारणास्तव शेतकरीवर्गाचा कल मल्चिंग पेपर वापरण्याकडे वाढल्याचे दिसते.

असे अंथरले जाते मल्चिंग पेपर

भाजीपाला पिकासाठी पहिल्यांदा जमीन तयार करून घेतली जाते. त्यानंतर मातीच्या सरी तयार करून घेतल्या जातात. दोन सरींमधील अंतर चार ते साडेचार फूट असते. या मातीच्या सरींवर ठिबक पाइप टाकली जाते व त्यावर मल्चिंग पेपर्स अंथरले जातात. त्यानंतर या पेपरला छिद्रे मारली जातात. पाच फुटांच्या अंतरावर मल्विंग पेपरवर माती टाकली जाते. यामुळे पेपर जमिनीला घट्ट पकडून राहतो. छिद्रे मारलेल्या ठिकाणी रोपे लावली जातात. मल्चिंग पेपर्स चंदेरी-काळ्या कलरमध्ये उपलब्ध आहेत. या पेपर्सच्या जाडीवरून याचे वेगवेगळे दर आहेत. 20, 25 व 30 मायक्रॉन या जाडी प्रकारांत हे मल्चिंग पेपर्स बाजारात उपलब्ध आहेत.

मल्चिंग पेपर वापराचे फायदे

पिकांना कमी पाणी लागते. तणांची वाढ रोखता येते. पिकांची वाढ चांगली होते. पिकांची रोगप्रतिकारक्षमता वाढते. कीड, रोगाचे प्रमाण कमी राहते. जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवते. पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.