तब्बल एक कोटीचे बक्षीस असलेल्या 11 जहाल नक्षलवाद्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. यावेळी सी – 60 जवानांचा सत्कार सोहळा पार पडला.
नवीन वर्षाची सुरुवात गडचिरोलीच्या सी -60 च्या अधिकारी आणि जवानांसोबत करता आली याचा आनंद आहे, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच राज्यातील नक्षलवाद लवकरच हद्दपार होईल, असा विश्वासही व्यक्त केला. यावेळी अहेरी ते गरदेवाडा बस सेवेला सुरुवात करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा येथे बस धावत आहे. पेनगुंडाला नवीन आऊटपोस्टही यावेळी सुरू करण्यात आले. तसेच कोनसरीमध्ये विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पांमुळे गडचिरोलीला स्टील सिटीचा दर्जा मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात माओवाद्यांच्या भरतीचे जाळे पूर्णपणे संपुष्टात आल्याचा दावा फडणवीस यांनी केला. पोलीस आणि जिल्हा प्रशासन अत्यंत मोलाचे काम करत असल्याचे ते म्हणाले.
देशातील दोन नंबर माओवादी कमांडरची पत्नी शरण
तारक्का ऊर्फ वस्तला ऊर्फ विमला सिडाम यांनी आत्मसमर्पण केले. तारक्का दक्षिण गडचिरोलीमधील मोठी माओवादी कमांडर असून माओवाद्यांच्या देशभरातील फळीतील क्रमांक 2 आणि सेंट्रल कमिटी तसेच पोलिट ब्युरो मेंबर (माओवाद्यांची सर्वात मोठी निर्णय करणारी यंत्रणा) भूपती ऊर्फ सोनू ऊर्फ मल्लोजुला वेणुगोपाल याची पत्नी आहे. म्हणजेच माओवाद्यांच्या रेटिंगमध्ये देशभरात जो नंबर दोनचा माओवादी कमांडर आहे त्याची ती पत्नी आहे.