Gadchiroli News : प्रशासनाचा हलगर्जीपणा; गरोदर महिलेला जेसीबीमध्ये बसण्याची वेळ

महाराष्ट्रात आजही दुर्गम भागांमध्ये नागरिकांचे छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्रचंड हाल होत आहेत. याचीच प्रचिती गडचिरोली जिल्ह्याती भामरागड तालुक्यामध्ये आली. पुरोगामी महाराष्ट्राला लाज वाटावा असा प्रकार भामरागड तालुक्यामध्ये घडला. गरोदर महिलेला रुग्णालयात जाण्यासाठी तीन किलोमीटर पायपीट करावी लागली आणि पुल ओलांडण्यासाठी चक्क जेसीबी पोकलॅंडमध्ये बसावे लागले. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कुडकेली येथील रहिवासी झुरी संदीप मडावी (वय 20) या गरोदर मातेसोबत हा भयंकर प्रकार घडला आहे. झुरी यांना काल (18 जुलै) सकाळी अचानक प्रसुती कळा सुरू झाल्या. त्यांनी तात्काळ त्याची माहिती आशा सेविका संगीता शेगमकर यांना सांगितली. संगीता शेगमकर यांनी सदर प्रकाराची माहिती बोटनफुंडी येथील सामुदायिक आरोग्य अधिकारी रिचा श्रीवास्तव यांना दिली. रिचा श्रीवास्तव या तात्काळ रुग्णवाहिका घेऊन कुडकेलीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. मात्र राष्ट्रीय महामार्गावरील कुडकेली नजीक असलेल्या नाल्यावरील रस्ता वाहून गेल्याने रुग्णवाहिका गावापर्यंच पोहचू शकली नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गरोदर मातेला तब्बल तीन किलोमीटर पायपीट करावी लागली. पाऊस आणि नाल्यातून पाणी वाहत असल्यामुळे नाल्यामधून पलीकडे जाणे गरोदर महिलेला शक्य नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांनी शक्कल लढवत जेसीबी पोकलॅंडमध्ये बसवून गरोदर महिलेला नाल्यापलीकडे नेले. त्यानंतर रुग्णवाहिकेत बसवून 12 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भामरागड रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. जेसीबी नसती तर गरोदर महिलेचा जीव धोक्यात आला असता.