एकीकडे सरकार तुमच्या दारी, अशा घोषणा करत असताना मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खालापूरकरांचे दुर्दशेचे फेरे संपलेले नाहीत. आदिवासींना मृत्यूनंतरही यातना सहन कराव्या लागत आहेत. पूल नसल्याने आरकस या आदिवासी वाडीतील मृत व्यक्तीची दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून अंत्ययात्रा काढावी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाजपच्या आमदाराने सहा महिन्यांपूर्वी पुलाच्या कामाचे भूमिपूजन केले. मात्र अद्यापही हा पूल कागदावरच आहे. त्यामुळे मिंधे सरकारच्या नावाने ‘राम नाम सत्य है’ असे म्हणण्याची वेळ आरकस वाडीमधील ग्रामस्थांवर आली आहे.
खालापूरच्या आरकस या आदिवासी वाडीतील नागरिकांना अंत्यविधीसाठी नदी पार करून पीरकट वाडीतील स्मशानभूमी गाठावी लागते. आठवडाभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आहे. नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थ कमरेपर्यंत पाण्यातून अंत्यविधीसाठी स्मशानभूमीपर्यंत जातात. आरकस वाडी येथे राहणारे कमल चौधरी यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी नातेवाईकांना जीव धोक्यात घालत नदीतून मार्ग काढून स्मशानभूमी गाठावी लागली. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करत भाजप आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र अद्याप या कामाची एकही वीट रचली गेली नाही. त्यामुळे सरकारच्या बेभरोसे कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
आरकसवाडीत एखाद्याचे निधन झाले तर नदीच्या पलीकडे असलेल्या पीरकत वाडीत अंत्यसंस्कारासाठी जावे लागते. स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे ग्रामस्थांना नाइलाजाने दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून प्रेतयात्रा काढावी लागते. देशाला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे उलटली तरी आरकसवाडीत स्मशानभूमी नसल्याने विकास गेला कुठे, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. उंबरणेवाडी, पीरकटवाडी आणि आरकसवाडीतील ग्रामस्थांनी नदीवर पूल बांधावा यासाठी अनेकदा आवाज उठवूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात नदीत पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने विद्यार्थ्यांना बऱ्याचदा शाळेला दांडी मारावी लागते. नदीवर पूल नसल्याने रुग्ण, गर्भवती महिला, सर्पदंश झालेल्या रुग्णांना वेळीच उपचार मिळत नसल्याने अनेकदा त्यांना जीव गमवावा लागतो.