पालिकेच्या एम/पश्चिम प्रभाग क्रमांक 153, चेंबूर विभागाला निधी देण्यासाठी ‘ओम श्री आयुक्ताय नमः’ असा अनोखा 101 वेळा मंत्रजप करीत शिवसेनेने आयुक्तांना अनोखे निवेदन दिले आहे. या विभागाला गेल्या अनेक महिन्यांपासून पालिकेकडून नागरी कामांसाठी निधी मिळत नसल्याने कामे खोळंबली आहेत. त्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने निधी द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांनी आयुक्त-प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.
राज्यात सत्तापालट झाल्यामुळे ‘मिंधे’ सरकारच्या दबावाखाली काम करणाऱया आयुक्तांकडून शिवसेनेचे प्राबल्य राहिलेल्या प्रभागांवर अन्याय केला जात असल्याचा आरोपही माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांनी केला आहे. यामुळेच प्रभाग क्र. 153, एम/पश्चिम विभागासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून निधीच दिला जात नाही. त्यामुळे रस्त्यांची डागडुजी, गटार-नाल्यांची कामे, पाणीपुरवठय़ासंबंधित कामे आणि नागरी कामे करता येत नाहीत. आयुक्तांकडे नागरी कामांसाठी निधी देण्याची मागणीही वारंवार करूनही निधी देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळेच आपण ‘ओम श्री आयुक्ताय नमः’ असा 101 वेळा जप करणारे निवेदन दिल्याचे पाटणकर यांनी सांगितले.