
अंधेरीत साकीनाका परिसरातील नीट केंद्र रातोरात बंद करून फरार झालेल्या मालकाला कर्नाटकातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. औरंगंदा अरविंद कुमार उर्फ आदित्य देशमुख असे अटक करण्यात आलेल्या नीट केंद्र मालकाचे नाव आहे. नीट घोटाळा प्रकाशझोतात आल्यानंतर महाराष्ट्रासह अनेक राज्यात सीबीआयकडून प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.
नीट संबंधित लोकांची चौकशी सुरू असतानाच महिनाभरापूर्वी सुरू केलेले नीट समुपदेशन केंद्र बंद करून देशमुख फरार झाला. कर्मचारी नेहमीप्रमाणे कार्यालयात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. कार्यालयाचे नूतनीकरणाचे काम सुरू करायचे आहे सांगत गुरूवारी देशमुख याने कर्मचाऱ्यांना लवकर घरी पाठवले. त्यानंतर रात्रीत कंपनीतील सर्व संगणक आणि इतर साहित्य घेऊन देशमुख कार्यालयाला टाळे ठोकून पळून गेला. शुक्रवारी कर्मचारी नेहमीप्रमाणे कामावर आले असता सर्व उघड झाले.
कर्मचाऱ्यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेत देशमुख विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी देशमुखचा शोध सुरू केला. अखेर कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात मार्केट यार्ड परिसरातून देशमुखला बेड्या ठोकल्या आहेत.