साखर, फॅटचे प्रमाण किती…पाकीटबंद खाद्यपदार्थांवर ठळक अक्षरांत लिहावे लागणार

बाजारात असे अनेक पॅकेजिंग फूड असते ते हेल्दी समजून आपण खरेदी करतो. मात्र त्यात असे काही घटक असू शकतात, जे आरोग्याला त्रासदायक ठरू शकतात. याची माहिती ग्राहकांना व्हावी, या हेतूने देशातील अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या (पॅकेजिंग फूड) लेबलवर साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅट याबाबत माहिती देणे अनिवार्य केले आहे. पंपन्यांना ही माहिती मोठय़ा आणि ठळक अक्षरांत पाकिटावर लिहावी लागणार आहे. प्राधिकरणाने यासंदर्भातील लेबलिंग नियमांमध्ये बदल करण्यास शनिवारी मान्यता दिली.

एफएसएसएआयचे अध्यक्ष अपूर्व चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली अन्न प्राधिकरणाच्या 44 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ग्राहकांना उत्पादनांचे पौष्टिक मूल्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता यावे आणि त्यांना चांगले निर्णय घेण्यास सक्षम करता यावे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. सूचना व हरकती मागवण्याच्या उद्देशाने या दुरुस्तीशी संबंधित मसुदा अधिसूचना आता सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवली जाईल. ग्राहकांना एखाद्या उत्पादनातील पोषक तत्वांबद्दल विस्तृत जानकारी मिळावी हा या नियमांमागे उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

– नव्या नियमानुसार, लेबलिंगमुळे पॅकेज फूडमध्ये पोषणमूल्य किती ते समजेल. पॅलरीचे प्रमाण, मॅक्रोन्यूट्रिएंट घटक उदाहरणार्थ कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट्स, विटामिन मिनरल, साखर यांचे प्रमाण समजेल.

– मधुमेह, उच्च रक्तदाब, फूड अॅलर्जी असलेल्या लोकांना न्यूट्रिशन लेबल वाचून काय खावे, काय खाऊ नये, हे ठरवता येईल. अनेक पाकिटबंद खाद्यपदार्थांत सोडियमचे प्रमाण जास्त असते. नव्या लेबलिंग नियमानुसार, सोडियमचे प्रमाण समजून घेता येईल.