श्री स्वामी समर्थ, ओम साईश्वरला विजेतेपद, शिवसेनेच्या खेळ महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद

खासदार अनिल देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित दक्षिण-मध्य मुंबईच्या सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सवाच्या उद्घाटनीय दिनी रस्सीखेच स्पर्धेत एकलव्य संघाने जेतेपद पटकावले तर खो-खोच्या पुरुष गटात श्री स्वामी समर्थ व्यायाम मंदिराने तर महिला गटात ओम साईश्वर सेवा मंडळाने अजिंक्यपद संपादले,

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त क्रीडा आणि सांस्कृतिक चळवळीला चालना देत  क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, कुस्ती, मल्लखांब, बुद्धिबळसारख्या स्पर्धांचे दिमाखदार आयोजन खासदार देसाई यांच्या संकल्पनेतून येत्या 16 फेब्रुवारीपर्यंत केले जाणार आहे. विशेष म्हणजे या महोत्सवात विजेत्यांवर तब्बल 9 लाख 31 हजार रुपयांच्या पुरस्कारांची उधळण केली जाणार आहे.

आजपासून सुरू झालेल्या रस्सीखेच स्पर्धेत पुरुष गटात एकलव्य संघाने बाजी मारली तर अनस्टॉपेबल व ब्लॅक पँथर हे संघ दुसऱया आणि तिसऱया पुरस्काराचे मानकरी ठरले. तसेच महिला गटात एच.बी.आर. बंट्स विजेता ठरला.  एकलव्य संघाने द्वितीय व दादर वॉरियर्स  तृतीय क्रमांक मिळवला. तसेच खो – खो स्पर्धेत पुरुष गटात श्री स्वामी समर्थ व्यायाम मंदिराने सरस्वती स्पोर्ट्स क्लबचा पराभव केला  तर महिला गटात ओम साईश्वर सेवा मंडळाने शिवनेरी सेवा मंडळावर मात करत जेतेपद संपादले. स्पर्धेचे वैयक्तिक पुरस्कार पियूष घोलम,  मुस्कान शेख, शुभम शिंदे, वैष्णवी परब, वेदांत देसाई यांनी मिळवले.

या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा विभाग प्रमुख व आमदार महेश सावंत, समर्थ व्यायाम  मंदिराचे अॅड.अरुण देशमुख, सिनेट सदस्य प्रदीप सावंत, माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर,  युवासेना सहसचिव  प्रथमेश बोभाटे, लॉटरी विव्रेता सेनेचे अध्यक्ष  मनोज वारंग,  युवासेना शाखा अधिकारी नितीन शिरोडकर  व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

खेळ महोत्सवात 15 क्रीडा स्पर्धांचे आयोजन

दक्षिण मध्य मुंबईच्या खेळ महोत्सवात तब्बल 15 क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. तब्बल तीस दिवस रंगणाऱया या खेळ महोत्सवात  पुरुष आणि महिला क्रिकेट, फुटबॉल, खो खो, बॅडमिंटन, पुस्ती, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, पंजा पुस्ती, रस्सीखेच, मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स, अॅक्रोबॅटिस आणि कबड्डी स्पर्धा या खेळांच्या भव्य स्पर्धांचे विविध ठिकाणी आयोजन केले जाणार आहे. विशेष म्हणजे 10 लाख रुपयांच्या पुरस्कारांची उधळण विजेत्यांवर केली जाणार असल्याची माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली.