पुरुष आणि महिलेने दीर्घकाळ संमतीने ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कार ठरू शकत नाही, असा स्पष्ट निर्वाळा प्रयागराज उच्च न्यायालयाने दिला. लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला होता, परंतु पुरुषाने सुरुवातीपासून महिलेला लग्नाचे वचन दिल्याचे पुराव्यावरून सिद्ध होत नाही. त्यामुळे हे प्रकरण बलात्काराच्या श्रेणीत येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आरोपीने जर लग्नाचे आमिष महिलेला दिले आहे तर त्याचे पुरावे सादर करणे आवश्यक आहे. जोपर्यंत फसवणूक झाल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपी दोषी आहे हे सिद्ध होत नाही, असेही न्यायालयाने म्हटले. महिलेने दाखल केलेल्या खटल्याविरोधात एका पुरुषाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
काय आहे प्रकरण
महिलेने एका तरुणाविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली. आरोपीने कनिष्ठ न्यायालयाच्या आरोपपत्राविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. पतीच्या मृत्यूनंतर संबंध प्रस्थापित झाल्याचा महिलेने दावा केला होता, परंतु महिलेचा पती जिवंत असतानाही हे संबंध सुरूच होते. महिला व आरोपींमध्ये 12 ते 13 वर्षांपासून शारीरिक संबंध होते. आपल्यापेक्षा खूप कमी वयाच्या तरुणासोबत महिलेने संबंध ठेवले होते.