पश्चिम रेल्वेवर आजपासून एसी लोकल फेऱ्यांमध्ये वाढ

पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या, बुधवारपासून एसी लोकलच्या 13 फेऱ्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे एसी लोकल फेऱ्यांची संख्या दिवसाला 96 वरून 109 फेऱ्यांपर्यंत तर साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी फेऱ्यांची संख्या 52 वरून 65 पर्यंत पोहोचणार आहे. एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असल्याने पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसी लोकलमुळे सर्वसामान्य लोकलला फटका बसणार असला तरी पश्चिम रेल्वेच्या एकूण फेऱ्यांवर याचा परिणाम होणार नाही असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर दिवसाला लोकलच्या एकूण 1406 फेऱ्या होतात. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या एसी लोकलच्या 13 फेऱ्यांपैकी 6 फेऱ्या अप तर 7 फेऱ्या डाऊन मार्गावर असतील. अप दिशेला विरार-चर्चगेट, भाईंदर-चर्चगेटदरम्यान प्रत्येकी दोन फेऱ्या तर विरार-वांद्रे आणि भाईंदर-अंधेरीदरम्यान प्रत्येकी एक फेरी असणार आहे. डाऊन मार्गावर चर्चगेट-विरारदरम्यान दोन फेऱ्या तर चर्चगेट-भाईंदर, अंधेरी-विरार, वांद्रे-भाईंदर, महालक्ष्मी-बोरिवली आणि बोरिवली-भाईंदर यादरम्यान प्रत्येकी एक फेरी असणार आहे.