हिंदुस्थानात रेल्वेने प्रवास करणे वाईट, ट्रेनमध्ये झुरळ, उंदीर आणि घाणीचे साम्राज्य दिसल्याने फ्रान्स पर्यटकाने व्यक्त केली खदखद

हिंदुस्थानच्या भटकंतीवर आलेल्या फ्रान्सच्या पर्यटकाने रेल्वे प्रवासादरम्यान आलेला भयंकर अनुभव सांगताना येथील रेल्वेने प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. रेल्वेने तब्बल 46 तास प्रवास केला. यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास झाला, असे तो सांगतो. फ्रान्समधील पर्यटक व्हिक्टरी ब्लाहोने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ अपलोड करून हिंदुस्थानात येऊ इच्छित असणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना इशारा दिला आहे.

जर हिंदुस्थानात रेल्वेने लांबचा प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ते अजिबात करू नका. मला अत्यंत वाईट अनुभव आले असून तुम्हाला सावधानतेचा इशारा देत असल्याचे त्याने सांगितले. संबंधित पर्यटकाने वाराणसी, वाराणसी ते आग्रा आणि आग्रा ते दिल्ली असा प्रवास व्हिडीओतून दाखवला. ‘46 तासांच्या प्रवासात मी स्लीपरपासून थर्ड एसीपर्यंत प्रत्येक श्रेणीच्या ट्रेनमध्ये प्रवास केला, पण तरीही अनुभव मात्र सारखाच होता, खूप वाईट. कधी माझ्या देशात परततो असे तेव्हा वाटत होते’, अशी खदखद त्याने मांडली. ब्लाहोने दाखवलेल्या व्हिडीओत रेल्वे गाड्या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या दिसतात. संपूर्ण प्रवासात फक्त त्रास आणि घाण अनुभवायला मिळाली असे तो सांगतो. त्याने रेल्वे गाड्यांमधील घाण, उंदीर आणि झुरळांचे साम्राज्य दाखवले. तसेच रेल्वे ट्रकवर असलेल्या कचऱ्यावरून टीकास्त्र सोडले.

रेल्वेचे भाडे जास्त, सोयीसुविधा कमी

हिंदुस्थानी रेल्वेने प्रवाशांना चांगल्या सोयीसुकिधा पुरवण्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे वारंवार दिसत आहे. रेल्के तिकीट वाढीसोबत तात्काळ तिकीट आणि प्रीमियम तिकिटाच्या नावाखाली जास्त भाडे आकारते. प्रवासाच्या एक दिवस आधी प्रीमियम तिकीट हवे असल्यास प्रवाशांना 165 रुपयांच्या एका तिकिटासाठी तब्बल 437 रुपये मोजावे लागतात. परंतु, तिकिटासाठी जास्त पैसे मोजूनही चांगल्या सुविधा मिळत नाहीत.