महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या असतानाच अजित पवार गटाची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व चिन्हाचा अंतिम फैसला होईपर्यंत अजित पवार गटाला दिलेले ‘घड्याळ’ चिन्ह गोठवा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्वोच्च न्यायालयाला स्वतंत्र अर्जाद्वारे केली आहे. याबाबत 25 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांनी अर्ज केला आहे. अजित पवार गटाला दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘घड्याळ’ चिन्ह गोठवून त्यांना नवे चिन्ह द्यावे, असे अर्जात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव व चिन्ह प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठापुढे होत आहे. हेच खंडपीठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन अर्जाची सुनावणी घेणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या अर्जामुळे अजित पवार गटाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
मतदारांमध्ये संभ्रम होतोय!
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला दिलेले ‘घड्याळ’ चिन्ह गोठवावे. आमच्या याचिकेवर अंतिम निर्णय यायला वेळ लागू शकतो. मतदारांमध्ये पक्ष चिन्हाबाबत संभ्रम आहे. त्यामुळे चिन्हाचा अंतिम निर्णय होईपर्यंत अजित पवार गटाला ‘घड्याळा’ऐवजी नवे चिन्ह द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे.
12 नोव्हेंबरला मुख्य प्रकरणाची सुनावणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व चिन्हासंबंधित मुख्य प्रकरणाची सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार आहे, मात्र या प्रकरणाच्या सुनावणीत ‘तारीख पे तारीख’चे सत्र सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वतंत्र अर्जावर न्यायालय 25 सप्टेंबरच्या सुनावणीत कोणती भूमिका घेतेय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाने फेब्रुवारीत दिला होता निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव व चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने फेब्रुवारीमध्ये निर्णय दिला होता. आयोगाने अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मानून नाव आणि चिन्ह दिले होते. या निर्णयाला आव्हान देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर अंतिम निर्णय देईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला पक्षाचे नाव व चिन्ह वापरण्यास मुभा दिली होती.