
उत्तर प्रदेशातील संभल जिह्यातील नरौली शहरात ‘फ्री गाझा, फ्री पॅलेस्टिन’ अशा आशयाचे पोस्टर झळकले. दुकानांच्या भिंतींवर लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरून पोलीस अधिक तपास करत आहेत. पोस्टर्समध्ये विशिष्ट समुदायाला इस्रायली वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही करण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सहा ते सात व्यक्तींची ओळख पटवली आहे. ज्या दुकानांच्या भिंतींवर पोस्टर्स आढळले त्या दुकान मालकांकडून माहिती गोळा केली जात आहे. काही दिवसांपूर्वी हे पोस्टर्स समोर आल्यानंतर तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ऑक्टोबर 2023 मध्ये हमासच्या नेतृत्वातील अतिरेक्यांनी दक्षिण इस्रायलवर हल्ला करून युद्धाला आमंत्रण दिले. तेव्हापासून इस्रायलचे आजतागायत गाझा पट्टीमधील हल्ले सुरूच आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टीतील 51,000 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले.