डेंग्यू, मलेरियाची मोफत चाचणी, ‘फिव्हर ओपीडी’, विभागीय वॉररूम;पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिका सज्ज

पावसाळय़ात साथीच्या आजारांचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका सज्ज झाली असून डेंग्यू, मलेरियाची मोफत चाचणी, फिव्हर ओपीडी, विभागीय वॉररूम आणि प्रमुख रुग्णालयांमध्ये तीन हजारांवर बेड तैनात ठेवले आहेत. सर्व यंत्रणांनी पावसाळी आजारांच्या प्रतिबंधासाठी एकत्रित पद्धतीने प्रयत्न करावेत, असे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले.

पावसाळी आजारांच्या पार्श्वभूमीवर विविध शासकीय, निमशासकीय, यंत्रणांचा समावेश असलेल्या डास निर्मूलन समितीची आढावा बैठक आज आयुक्तांनी पालिका मुख्यालयात घेतली. डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांवर प्रतिबंधासाठी विविध यंत्रणांच्या सहाय्याने सामूहिक पद्धतीने योगदान गरजेचे आहे, असे आवाहन आयुक्त गगराणी यांनी केले. पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमधील कम्युनिटी मेडिसिनमधील चार तज्ञ डॉक्टरांचा चमू प्रत्येक विभागामध्ये पावसाळी आजारांच्या उपाययोजनांसाठी मदतीला असणार आहे. या तज्ञ डॉक्टरांचा अनुभव तसेच वैज्ञानिक पद्धतीने रूग्ण हाताळण्याची उपचार पद्धती विभागांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

– पालिका आणि खासगी प्रयोगशाळेच्या ठिकाणी नियमितपणे रुग्णसंख्या अद्ययावत करण्यासाठी प्रयोगशाळांची संख्या 20 वरून 800 केली आहे.
– पावसाळी आजारांच्या उपचारासाठी पालिकेने तीन हजार बेडची व्यवस्था केली आहे. यामध्ये केईएम 30, शीव 162, नायर रुग्णालय 411, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कूपर रुग्णालय 107 रुग्णशय्या तसेच उपनगरीय सर्वसाधारण रुग्णालयात 961 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

एकवीस हजार ठिकाणी आढळला डेंग्यू, मलेरिया

मुंबईत पावसाळी आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केली असून जूनअखेर डेंग्यूचे 93 तर मलेरियाचे 443 रुग्ण आणि गॅस्ट्रोचे 722 रुग्ण आढळले. शिवाय मलेरियाच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरणाऱया अॅनोफिलीस डासांची 2,797 तर डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत एडिस डासांची 18,701 उत्पत्ती स्थाने आढळली आहे. दरम्यान, पावसाळय़ात साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी पालिकेने तीन हजार बेड तैनात ठेवले आहेत.

साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी 1 ते 30 जूनदरम्यान 7 लाख 15 हजार 32 घरांचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात 29 लाख 87 हजार 388 लोकांचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात 1 लाख 44 हजार 179 लोकांचे मलेरिया चाचणीसाठी नमुने गोळा केले.

मलेरिया नियंत्रण

– 4,730 परिसरात तपासणी
– 28,928 मलेरिया डासांची उत्पत्ती स्थानांची संख्या
– 2,797 अॅनोफिलीस डासांच्या उत्पत्तीची संख्या

 

डेंग्यू नियंत्रण

– 11,45,505 घरांची झाडाझडती
– 12,44,330 पंटेनरची तपासणी
– 18,701 एडिस डासांच्या उत्पत्ती स्थाने आढळली