शेअर ट्रेडिंगच्या नावाने फसवणूक करणारे अटकेत; मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांची कारवाई

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली वृद्ध व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या तिघांना मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. सतीश यादव, विकास मौर्या आणि सचिन चौरसिया अशी त्या तिघांची नावे आहेत. सतीश हा मुख्य सूत्रधार काही जणांच्या संपका&त होता. त्याने एका बँकेत बनावट नावाने खाते उघडले होते. त्यात दीड कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांचा व्यवसाय आहे. जानेवारी महिन्यात त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले गेले. त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देऊ असे सांगितले होते. जास्त नफा मिळेल या हेतूने त्यांनी 3 कोटी 81 लाख रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यावर त्यांना चांगला परतावा मिळाला नव्हता. तसेच त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले नव्हते. त्याबाबत त्यांनी ग्रुप अॅडमिनला विचारणा केली, तेव्हा त्याने आणखी 1 कोटी 19 लाखांची मागणी केली. ती रक्कम भरल्यावर खात्यात पाच कोटी रुपये जमा होतील असे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मध्य प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. प्रभारी पोलीस निरीक्षक मौसमी पाटील यांच्या पथकातील वचकल, बाबरे, खर्चे आदींनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी सतीश आणि विकासला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर सतीशने बनावट नावाने शेल पंपनी सुरू केली. त्या नावाने बँकेत खाते उघडले. त्या खात्यात फसवणुकीचे दीड कोटी रुपये जमा झाले होते. त्यासाठी त्याला सचिननेदेखील मदत केली होती. ती रक्कम ठगांना दिल्यावर त्याला काही रक्कम कमिशन म्हणून मिळणार होती. पोलिसांनी सचिनलादेखील ताब्यात घेऊन अटक केली.