कर्ज न घेताच झाला कर्जबाजारी; बनावट आधार, पॅन कार्ड वापरून फसवणूक; राहुरीत गुन्हा दाखल

दुचाकी घेण्यासाठी बँकेत कर्ज मागायला गेलेल्याच्या नावावर अगोदरच 4.5 लाख रुपयांचे कर्ज असल्याचे समजताच, त्याला जोरदार धक्का बसला. बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड वापरून सदर इसमाची 4.5 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

याबाबत राहुरी तालुक्यातील मालुंजा खुर्द येथील रहिवाशी नितीश दादासाहेब पवार यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. दुचाकी घ्यायची असल्याने मी श्रीरामपूर येथील आयडीएफसी बँकेत कर्जासाठी अर्ज केला. मात्र, तेथील अधिकाऱ्याने सिबिल चेक केले असता, माझ्या नावावर पहिलेच कर्ज असल्याचे सांगितले. तेव्हा मी आतापर्यंत कधीच कर्ज घेतले नसल्याचे सांगितले. तेव्हा मनीष अनिल पालव (रा. उल्हासनगर) याने तुमच्या अकाऊंटला जॉइंट अकाऊंट करून वेगवेगळ्या ठिकाणांहून कर्ज घेतले आहे. मनीष पालव याने विविध बँका तसेच फायनान्स कंपन्यांकडून जवळपास 4 लाख 45 हजार 76 रुपयांचे कर्ज घेतले असून, त्यापैकी 2 लाख 29 हजार 870 रुपये कर्ज भरणे बाकी आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. सदर व्यक्तीने आपली सहमती नसताना आपल्या आधार कार्ड व पॅन कार्डचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर 4 लाख 45 हजारांचे कर्ज काढून फसवणूक केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. या फिर्यादीवरून मनीष पालव याच्याविरुद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.