महिला बचत गटांच्या नावावर कर्ज हडपले, घोटाळेबाजांची फक्त चौकशी; गुन्हा दाखल करण्यास मात्र टाळाटाळ

महिला बचत गटांच्या नावावर परस्पर कर्ज काढून ते हडप करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात मात्र टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील महिला बचत गटांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एसबीआयच्या तलासरी शाखेतील या घोटाळेबाजांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी तालुक्यातील बचत गटांकडून करण्यात आली आहे.

महिला बचत गटांच्या नावे परस्पर कर्ज काढून लाखोंचा घोटाळा केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा घपला एसबीआयच्या तलासरी शाखेचे शाखा व्यवस्थापक अमित कुमार आणि लिपिक राहुल धनावडे यांनी केल्याचे उघड झाले आहे. दैनिक ‘सामना’ने 9 मार्च रोजी वृत्त प्रसिद्ध करून या घोटाळ्याला वाचा फोडली होती. त्यानंतर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या दोघांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. मात्र लाखोंचा घोटाळा होऊनही आर्थिक गुन्हे शाखा किंवा पोलिसांत अजूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

■ तलासरी स्टेट बँकेत हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर बचत गटांत भीती निर्माण झाली होती. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी अधिकारी नेमून कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

■ हिमालय बचत गटाच्या न घेतलेला कर्जाच्या व्याजापोटी खात्यावरून 81 हजार रुपये कापले होते. ही रक्कम 10 मार्च रोजी खात्यावर जमा करण्यात आली आहे. मात्र कर्ज अजूनही तसेच असल्याची माहिती बचत गटानी दिली आहे.