समाज माध्यमावर झटपट पैसा कमावण्याचा वेगवेगळा मार्ग दाखवून बेरोजगारांना चुना लावणाऱया राजस्थानातील दोघा सायबर गुन्हेगारांना डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या.
दिया (21) ही तरुणी ऑनलाईन जॉब शोधत होती. इन्स्टाग्रामवर तिला एका जॉबची जाहिरात दिसली. त्यावर तिने संपर्क केला असता आमचा एक प्रोजेक्ट असून दिवसाला सहा ते सात पाने टाइप करून दिली तर 600 रुपये मिळतील. त्यापेक्षा आणखी पाने टाइप करून दिल्यास तीन हजार दिवसाला कमावू शकता असे तिला समोरच्यांकडून सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवल्याने ठगांनी रजिस्ट्रेशन फी, प्रोजेक्ट फी, ऑप्लिकेशन फीच्या नावाने पैशांची मागणी केली.
त्यानंतर बोनस आणि जीएसटीसाठी अतिरिक्त पैसे मागायला सुरुवात केली. त्यामुळे दियाला संशय आला. तिने तिचे पैसे परत मागितल्यावर भामटय़ांनी तिला टाळण्यास सुरुवात केली. मग तिने पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर वरिष्ठ निरीक्षक विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तुकाराम डिगे तसेच धायगुडे, पावरा या पथकाने तपास सुरू केला. पथकाने तांत्रिक तपास केला असता आरोपी राजस्थानच्या मासावा गावचे असल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन मुकेश मेहरा (22) आणि त्याचा मित्र मोहन चौधरी (22)या दोघांना पकडून आणले. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. यातील एका आरोपीच्या मामाचा मुलगा हा मुख्य आरोपी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.