
एका खासगी हिंदी वाहिनीमधील मालिकेत काम देतो असे सांगून तरुणाची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार तरुण हा अंधेरीच्या वर्सोवा येथे राहतो. त्याने अभिनय शिकण्यासाठी एका व्हॉट्सऍप ऑडिशन ग्रुप जॉइन केले होते. एका ग्रुपमधून त्याला फोन आला. त्याने त्याचे नाव सांगून तो कास्टिंग डायरेक्टर असल्याचे सांगितले. त्यानंतर तरुणाला व्हॉट्सऍपवर ऑडिशन पाठवण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्याने ऑडिशन पाठवून दिले.
मे महिन्यात तरुणाला फोन आला. मालिकेसाठी निवड झाल्याचे त्याला सांगितले. मालिकेत काम करण्यासाठी नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर दोन वर्षांचा करार होईल. करार झाल्यावर प्रोडक्शन हाऊसकडून धनादेश मिळेल असे त्याला सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्याने पैसे पाठवले. पैसे पाठवल्यानंतर त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने दोघांकडे विचारणा केली. त्याने टाळाटाळ करून आणखी पैशांची मागणी केली. फसवणूक झाल्याचे समजताच त्याने वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.