
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पास झाले असले तरी एनडीएतील घटकपक्ष असलेल्या जनता दल यूनायटेडमध्ये (जदयू) यावरून कलह सुरू झाला आहे. जदयूमध्ये यावरून दोन गट पडले असून एका मागोमाग एक 4 नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. यामुळे बिहारच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. आगामी काळात बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे या गटबाजीचा फटका जदयूला निवडणुकीतही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वक्फ सुधारणा विधेयकाला जदयूने पाठिंबा दिला आहे. याचा निषेध म्हणून एम. राजू नय्यर यांनी राजीनामा दिला आहे. वक्फ सुधारणा विधेयकाला जदयूने पाठिंबा दिल्याने मी पक्ष सोडत आहे. मुस्लिमांवर अत्याचार करणाऱ्या काळ्या कायद्याच्या बाजूने जदयूने मतदान केल्या मी खूप व्यथित झाले असून त्यामुळे पक्ष सदस्यात्वाचा त्याग करत आहे, असे एम. राजू नय्यर यांनी म्हटले.
दरम्यान, याआधी तीन मुस्लिम नेत्यांनीही पक्षाला रामराम केला आहे. सिद्दीकी अलिग, मोहम्मद शाहनवाज मलिक आणि मोहम्मद कासिम अन्सारी अशी तिघांची नावे आहेत. नितीश कुमार यांनी मुस्लिम समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत या नेत्यांनी पक्ष सोडला आहे.
सरकारला वक्फ जमिनीची चिंता, चीन, पाकिस्तानने गिळंकृत केलेल्या जमिनींचे काय? संजय राऊत यांचा सवाल
काय म्हणाले मोहम्मद कासिम अन्सारी?
मोहम्मद कासिम अन्सारी यांनी आपला राजीनामा जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पाठवला आहे. ‘आमच्यासारख्या लाखो हिंदुस्थानी मुस्लिमांना विश्वास होता की तुम्ही पूर्णपणे धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे ध्वजवाहक आहात, परंतु आता आमच्या विश्वासाला तडा गेला आहे. सदनामध्ये लल्लन सिंग यांनी ज्या पद्धतीने या विधेयकाचे समर्थन केले ते पाहून खूप वाईट वाटते. वक्फ विधेयक हे हिंदुस्थानी मुस्लिमांच्या विरोधात आहे. आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारू शकत नाही. हे विधेयक संविधानातील अनेक मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करते. या विधेयकाद्वारे हिंदुस्थानी मुस्लिमांचा अपमान केला जात आहे’, असे ते राजीनामा देताना म्हणाले.
राजीनाम्यावर जदयूची प्रतिक्रिया
जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी मुस्लिम नेत्यांनी दिलेल्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मोहम्मद कासिम अन्सारी आणि नवाज मोहम्मद शाहनवाज मलिक हे पक्षाचे पदाधिकारी नसल्याचे ते म्हणाले.