
शेतकऱ्यांच्या संतापानंतर नागोठण्याच्या पळस ग्रामपंचायतीने जेएसडब्ल्यू कंपनीच्या हायटेन्शन लाईनचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. तसे पत्रदेखील तत्काळ तयार करण्यात आले. मात्र तीन दिवस उलटले तरी हे पत्र ग्रामपंचायतीच्या दप्तरात धूळ खात पडले होते. याबाबत गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत अनेक सवाल उठवले. त्यानंतर आज सरपंचांसह अन्य सदस्यांनी हे पत्र कंत्राटदाराच्या हाती चिटकवले आहे. ‘दाबून’ ठेवलेले हे पत्र अखेर बाहेर निघाल्याने मुजोर कंत्राटदार राजेश चौधरी याला चाप लागेल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
… तोपर्यंत काम बंद राहील
ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया डाकी, उपसरपंच चंद्रकांत भालेकर, निष्ठा विचारे, किसान बोरकर, सतीश डाकी, पपू वाघमारे, परीक्षा घासे, सुरेखा नाईक, उषा साळुंखे यांनी आज बीएनसी कंपनीचे ठेकेदार रामण्णा यांची भेट घेत त्यांना ग्रामपंचायतीचे पत्र दिले. कंपनीने गावकऱ्यांबरोबर संयुक्त बैठक घेऊन शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा. तोपर्यंत कोणतेही काम करू नये असे ग्रामपंचायतीने कंत्राटदाराला सांगितल्याचे उपसरपंच चंद्रकांत भालेकर यांनी सांगितले.
टीकेची उठली झोड
जेएसडब्ल्यू कंपनीच्या हायटेन्शन लाईनविरोधात पळस ग्रामपंचायतीत पळस, बाहेरशीव, वागळी, शेतपळस येथील गावकऱ्यांची तीन दिवसांपूर्वी बैठक झाली होती. यावेळी हायटेन्शन लाईनचे रेटण्यात येत असलेले काम आणि बाहेरशीव येथील महिलांना बीएनसी कंपनीचा अधिकारी राजेश चौधरी व राम घरत यांनी मातीत गाडण्याची दिलेल्या धमकीवरून तीव्र संताप व्यक्त करत हे काम तत्काळ थांबवण्याची मागणी नागरिकांनी केली. याची दखल घेत ग्रामपंचायतीने बीएन्सी कंपनीला काम करण्यास्य महाव करण्याचा तयार करण्यात आले. मात्र तीन दिवस उलटले तरी हे पत्र कंत्राटदाराला देण्यात आले नव्हते. याबाबत गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत ग्रामपंचायतीवर टीकेची झोड उठवली होती.