…तर रविवारची समुद्रीसफर जीवावर बेतली असती, चार विद्यार्थ्यांची सुरक्षा दलाने केली सुटका

उंच व फेसाळलेल्या लाटांचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांची रविवारची समुद्रीसफर जीवावर बेतली असती. लागून आलेल्या सुट्टीनिमित्त नवी मुंबईतील चार विद्यार्थी आज सकाळी पिरवाडी दर्गाजवळील समुद्रकिनाऱ्यावर गेले. तेथे समुद्रात खडकांच्या बेटावर बसून मौजमजा करत असताना अचानक भरती आली आणि ते चौघेही खडकावर अडकले. ही बाब समोर येताच सुरक्षादलाच्या जवानांनी धाव घेत या विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका केली.

नवी मुंबईतील ऐरोली येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेले शैलेश काळे, सुमेध मिश्रा, सागर गावणे व सुमेध आबासदा हे चौघे मित्र आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पिरवाडी बीचवर फिरण्यासाठी आले होते. सकाळी ओहोटी असल्याने ते चालत खोल समुद्रातील बेटावर जाऊन पोहोचले. मात्र अचानक भरती सुरू झाली आणि बघता बघता बेटाच्या चारही बाजूने जोरदार लाटा व प्रचंड प्रवाहामुळे ते विद्यार्थी अडकले. दरम्यान त्यांचा आरडाओरडा ऐकूण सागरी सुरक्षादलाच्या जवानांनी दोन बोटींच्या मदतीने या विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका केली.

या पथकाने केले बचावकार्य
उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र यांनी सागरी सुरक्षारक्षक दलाचे सदस्य स्वप्नील माळी, संतोष कडू, योगेश काठे, नवशाड कुरेशी, अकबर कुरेशी, योगेश म्हात्रे, अवधूत पाठारे यांच्या मदतीने हे बचावकार्य केले. हे बेट धोकादायक असून या ठिकाणी याआधी दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.