जम्मू-कश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला मोठा अपघात, 4 जवान शहीद, 2 जखमी; 12 दिवसांत दुसरी घटना

जम्मू-कश्मीरात जवानांना घेऊन जाणारा लष्कराचा ट्रक दरीत कोसळला. यात 4 जवान शहीद झाले. काही जवान जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रचंड बर्फवृष्टी, खराब हवामान आणि कमी दृष्यमानता यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या 12 दिवसांत लष्कराच्या वाहनाला झालेला हा दुसरा अपघात आहे.

बांदीपोरा जिह्यातील एसके पायन भागात दुपारी 2.30च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या डोंगराळ भागातून जवानांना घेऊन ट्रक जात होता. एका अवघड वळणावर ट्रक घसरला आणि खोल दरीत कोसळला. तीन जवानांचा जागीच मृत्यू झाला. लष्कराने तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमी जवानांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वी एका जखमी जवानाचा मृत्यू झाला.

बर्फवृष्टी, कमी दृष्यमानता यामुळे अपघात वाढले

  • उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट आहे. जम्मू-काश्मीरात तापमान शून्य अंशाखाली गेले आहे. बर्फवृष्टी, धुके, कमी दृष्यमानतामुळे अपघात वाढले आहे.
  • 24 डिसेंबर 2024 रोजी पुंछ जिह्यात लष्कराचे वाहन 350 फूट दरीत कोसळले होते. त्यात पाच जवान शहीद झाले होते. तत्पूर्वी 4 नोव्हेंबर 2024 रोजी राजौरी जिह्यात लष्कराचे वाहन दरीत कोसळून एका जवानाचा मृत्यू झाला होता.