Somnath Suryavanshi सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी फौजदारासह चार पोलीस निलंबित

शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूप्रकरणी जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस अंमलदार अशा चौघांना सेवेतून निलंबित करण्यात आले. असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आंबेडकरी अनुयायांनी परभणी ते थेट मुंबई असा लाँग मार्च काढला होता. हा लाँग मार्च नाशिक येथे पोहोचला असता मोर्चेकऱयांशी चर्चा करून मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर लाँग मार्च मागे घेऊन मोर्चेकरी परभणीकडे रवाना झाले.

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. आता आणखी चौघांचे निलंबन झाले आहे. परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यातील फौजदार कार्तिकेश्वर तुरनर, पोलीस अंमलदार सतीश दैठणकर, मोहित पठाण व राजेश जटाळ यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची 10 डिसेंबर 2024 रोजी माथेफिरूने तोडफोड केली होती. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी परभणीत पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान झालेली जाळपोळ व दगडफेकीच्या घटनानंतर गुन्हे दाखल करून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले होते. न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा 15 डिसेंबर रोजी पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. यानंतर या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले. दरम्यान, सोमनाथच्या अंत्यविधीवरून परतत असताना दलित चळवळीचे नेते विजय वाकोडे यांचाही अतिताणामुळे हृदयविकाराने मृत्यू झाला. पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा यासाठी परभणीत धरणे आंदोलन करण्यात आले होते, मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने न्यायासाठी परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आला.

हा लाँग मार्च रविवारी नाशिक येथे पोहोचला. यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार सुरेश धस, यांच्यासह पोलीस प्रशासनाने लाँग मार्चमधील आंदोलनकर्त्यांची समजूत घालून चार पोलीस कर्मचाऱयांचे निलंबन व बहुतांश मागण्या मंजूर केल्याचे पत्र दिले. उर्वरित मागण्यांसाठी एक महिन्याचा कालावधी मागितला. यानंतर लाँग मार्च स्थगित करण्यात आला असून लाँग मार्चमधील कार्यकर्ते परभणीकडे परत निघाले आहेत.