
नागपूरच्या कोतवालबर्डी येथील एशियन फायर वर्क्स या फटाका कारखान्यात आज दुपारी दोनच्या सुमाराला भयंकर स्पह्ट होऊन आग लागली. या दुर्घटनेत दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले. या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीत मूळचे मध्य प्रदेशचे असलेले भुरा रजत (25) आणि मुनीम मडावी (29) यांचा जागीच मृत्यू झाला.
मस्जिद बंदरमध्ये आज सकाळी सहाच्या सुमाराला इमारतीला लागलेल्या आगीत धुरामुळे गुदमरून दोघा महिलांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. पाच जणांपैकी तिघांची प्रकृती स्थिर असून दोघांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले. दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मस्जिद बंदर येथील इसाजी मार्गावरील पान्नअली मेन्शन या 11 मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या वायरिंगला सकाळी सहाच्या सुमाराला आग लागली. आगीमुळे वायरिंग, मीटर बॉक्स जळून खाक झाला. आग पसरल्यामुळे पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या साजिया शेख (21) आणि शाबिला शेख (40) या महिला घाबरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना जखमी झाल्या. त्याचबरोबर धुरामुळे गुदमरून बेशुद्ध पडल्या. त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे दाखल करण्याआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.