रोहतकहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये स्फोट झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. स्फोटानंतर ट्रेनच्या बोगीला आग लागल्याने चार प्रवासी गंभीर भाजले. चौघांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
ट्रेनमध्ये एक व्यक्ती सल्फर-पोटाश घेऊन जात होते. या सल्फर-पोटाशमुळेच हा स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. एफएसएल पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. बॉम्ब निकामी पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, रोहतक रेल्वे स्थानकावरून दुपारी 4.20 च्या सुमारास ही ट्रेन दिल्लीकडे रवाना झाली. सांपला स्थानकावरून ट्रेन काही अंतरावर जाताच अचानक एका बोगीमध्ये स्फोट झाला. यानंतर ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला. तात्काळ ट्रेन थांबवण्यात आली. चालकाने तात्काळ स्टेशन मास्टरला घटनेची माहिती दिली. तपासणी केल्यानंतर ट्रेन दिल्लीला रवाना करण्यात आली. पोलीस पुढील तपास करत आहेत.