जगभरातील बातम्यांचा आढावा

आसामवर अस्मानी संकट…
आसाममधील 27 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. यावर्षी आतापर्यंत पूर, भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे 85 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 18.80 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. ब्रम्हपुत्रासारख्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. 25 जिह्यात 543 मदत केंद्र शिबीर बनवण्यात आली आहेत. या शिबिरात 3 लाख 45 हजार 500 लोक आश्रय घेत आहेत.

वर्षभर मंगळ ग्रहात राहूनही सुखरूप
नासाचे चार शास्त्रज्ञ मंगळ ग्रहावर वर्षभर वास्तव्य करून पृथ्वीवर परतले आहेत. तुम्ही विचार कराल, मंगळ ग्रहावर कुणी माणूस अद्याप पोचलेला नाही, मग हे चौघे कसे आणि कधी गेले? खरंतर नासा मंगळावर माणूस पाठवण्याच्या प्रयत्नात आहे. मंगळावर काय अडचणी येऊ शकतात, यादृष्टीने त्याचे संशोधन सुरू आहे. त्यासाठी नासाने थ्रीडी प्रिंटरच्या मदतीने मंगळ ग्रहासारखे वातावरण बंद जागेत तयार केले आणि त्यात चार जणांना पाठवले. त्या मंगळसदृश वातावरणात 378 दिवस घालवल्यानंतर ते चौघे बाहेर आले. हुस्टनच्या स्पेस सेंटरमध्ये 1700 चौरस फुटांचे स्पेशल घर बनवले. त्यात दोन मिशन स्पेशालिस्ट, दोन अन्य प्रोफेशनल आणि एका मेडीकल ऑफिसरला पाठवले. वर्षभरात चौघांनी त्या घरात भाजीपाला पिकवला. यानाची देखभाल-दुरुस्ती केली.

– मंगळावर माणूस गेला तर त्याला कोणत्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागेल हे जाणून घेण्यासाठी नासाने हा प्रयोग केला. या मिशनचे नाव ‘क्रू हेल्थ अँड परफॉर्मन्स एक्सप्लोरेशन अॅनालॉग’ असे आहे. या दरम्यान शास्त्रज्ञांना मंगळावर जसे वातावरण असते तशाच वातावरणात ठेवण्यात आले.

टीव्ही पाहणे होणार स्वस्त
येत्या काळात टीव्ही बघणे स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण ट्रायने डिस्ट्रीब्युशन प्लॅटफॉर्म ऑपरेटरच्या (डीपीओ) वतीने ग्राहकांना चॅनेल बुकेवर दिली जाणारी सवलत 45 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. सध्या ही सवलत 15 टक्के आहे.

सोने स्वस्त, चांदी महागली
सोन्याच्या दरात मंगळवारी घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याचा भाव 292 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅमसाठी 72 हजार 454 रुपयांवर आला. चांदीच्या भावात 159 रुपयांनी वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव 91 हजार 892 रुपयांवर पोहोचला.

शेअर बाजार नव्या उच्चांकावर
शेअर बाजाराने पुन्हा एकदा नव्या उच्चांकावर झेप घेतली. सेन्सेक्स 391 अंकांच्या वाढीसह 80 हजार 351 अंकांवर बंद झाला, तर निफ्टीसुद्धा 112 अंकांच्या वाढीसोबत 24 हजार 433 अंकांच्या नव्या उच्चांकावर पोहोचून बंद झाला.

हिंदुस्थानी विद्यार्थ्याचा अमेरिकेत बुडून मृत्यू
अमेरिकेच्या ट्राईन विद्यापीठात शिक्षण घेणाऱया हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा न्यूयॉर्कच्या बार्बरविल धबधब्यात पाय घसरल्याने बुडून मृत्यू झाला. 7 जुलै रोजी ही घटना घडली. या विद्यार्थ्याचे नाव साई सूर्य अविनाश गड्डे असे आहे.

उड्डाण घेताच विमानाचे चाक निखळले
अमेरिकेतील लॉस एंजिल्समध्ये युनायटेड एअरलाइन्सच्या बोइंग जेट विमानाने उड्डाण घेताच त्याचे चाक निखळले. यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. विमान पंपनीने ही माहिती दिली. विमानाचे चाक जप्त करण्यात आले असून याची चौकशी केली जात आहे. बोइंग 757-200 या विमानात 174 प्रवासी आणि पायलटसोबत अन्य सात जण क्रू मेंबर होते. याआधी मार्चमध्येही सॅन फ्रॅन्सिस्कोहून उड्डाण करणाऱया युनायटेड एअरलाइन्सच्या बोइंग बी 777-200 जेट विमानाचे चाक हवेतच निखळले होते.